अहमदनगर : महापाैर निवडीसाठी बुधवारी (३० जून) ऑनलाईन सभा होत असून, नामर्निदेशनपत्र दाखल करण्यासाठी अंतिम मुदत २९ जूनपर्यंत आहे. नामर्निदेशनपत्रांची छाननी प्रत्यक्ष सभा सुरू झाल्यानंतर करण्यात येणार आहे. महापौरपदासाठी प्रथमच ऑनलाईन मतदान होणार आहे.
महापालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी भोसले यांनी शुक्रवारी महापौर व उपमहापौर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार महापौर व उपमहापौर पदासाठीचे नामर्निदेशनपत्र सोमवारपासून स्वीकारले जाणार आहे. महापालिकेच्या नगरसचिव कार्यालयात नामर्निदेशनपत्र उपलब्ध असतील. नामर्निदेशनपत्र दाखल करण्यासाठीची अंतिम मुदत २९ जून रोजी दुपारी १.३० पर्यंत आहे. महापौर व उपमहापौर पदासाठी प्राप्त अर्जांची छाननी पीठासीन अधिकाऱ्यांच्या उपस्थित बुधवारी सकाळी सभागृहात केली जाणार आहे. नामर्निदेशनपत्र मागे घेण्यासाठी १५ मिनिटांची वेळ दिली जाईल. त्यानंतर ऑनलाईन मतदानाला सुरुवात होईल, असे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
......
हे आहेत ऑनलाईन सभेचे नियम
नगरसेवकांनी मतदानासाठी एका खोलीत एकट्याने उपस्थित रहावे.
सभेच्या कालावधीत मतदानाप्रसंगी खोलीत कुणालाही प्रवेश देऊ नये.
कॅमेरा व सदस्यांतील अंतर ६ फुटाचे असावे.
सदस्य ऑनलाईन न दिसल्यास अनुपस्थित गृहीत धरली जाईल.
मोबाईलला बॅटरी फुल चार्ज असावी, नेटवर्कला स्पीड असणे आवश्यक आहे.
सभा सुरू होण्याआधी अर्धा तास सहभागी होऊ शकतात.
निवडणुकीनंतर मनपा परिसरात मिरवणूक काढू नये.