विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगाव शिवारात बुधवारी दुपारी चारच्या सुमारास हरीण मृतावस्थेत आढळून आले.
दुपारी चारच्या सुमारास सुरेगावचे सामाजिक कार्यकर्ते गुलाबराव रामफळे हे कोळगावकडे जात असताना त्यांना हरीण मृतावस्थेत आढळले. वनरक्षक हरिश मुंडे यांच्याशी संपर्क साधल्याने वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या उन्हाळ्यात लगडवाडी, सुरेगाव शिवारातील जंगलातील झाडांना पालाही शिल्लक राहिलेला नाही. वन्यप्राण्यांची सावली, चारा व पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. वनविभागाने निधी उपलब्ध करून विसापूर फाटा, लगडवाडी, सुरेगाव, घुटेवाडी, चिखली, कोरेगाव, कोळगाव येथील जंगलात पाणवठे तयार करावेत, अशी मागणी वन्य प्राणिमित्रांनी केली आहे.
--
विसापूर रस्त्यालगत मुंगुसगाव-सुरेगाव शिवारात एक हरीण मृतावस्थेत आढळले. त्या हरणाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ते रस्त्याजवळ मृत झाल्याची शक्यता आहे. त्या हरणाचा एक पाय मोडलेला व शरीराला जखमा झाल्याचे दिसून आले.
- मच्छिंद्र गुंजाळ,
वनपाल, प्रादेशिक वनविभाग, श्रीगोंदा