अहमदनगर : गेल्या अडीच वर्षांपूर्वी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून पूर्ण झालेला दरेवाडी-उक्कडगाव रस्ता आता जागोजागी उखडला असून, या रस्त्याची दुरुस्ती करण्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या प्रशासनाने हा रस्ता दुरुस्त करण्याची ग्वाही दिली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत रस्त्यावरील सर्व खड्डे बुजविण्याचे काम सुरू होईल, अशी माहिती या योजनेचे कनिष्ठ अभियंता हंसराज रणधीर यांनी ‘लोकमत’ला दिली.
दरेवाडी-उक्कडगाव या साडेसहा किलोमीटर रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम जानेवारी २०१८ मध्ये पूर्ण झाले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून पावणेतीन कोटी रुपये खर्चून हे काम झाले; परंतु पुढे दोन वर्षांतच हा रस्ता जागोजागी उखडला. यंदाच्या पावसाळ्यात तर या रस्त्याची आणखी दुर्दशा झाली असून, रस्त्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी प्रवाशांतून होत होती. त्याबाबत ‘लोकमत’च्या १५ डिसेंबरच्या अंकात वृत्त प्रकाशित झाले. याबाबत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे सहायक अभियंता हंसराज रणधीर यांना विचारले असता ते म्हणाले, पावसामुळे गेल्या दोन-तीन महिन्यांपासून हा रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे त्याच्या दुरुस्तीचे काम येत्या दोन-तीन दिवसांत सुरू होईल. त्यानंतर हा रस्ता बांधकाम विभागाकडे हस्तांतरित केला जाईल.
------------------