अहमदनगर : महापालिकेचा आदेश धाब्यावर बसवून जिओ इन्फोकाॅम लिमिटेडने रस्त्यात खांब उभे करण्याचा सपाटा लावला आहे. बांधकाम विभागाने वेळोवेळी स्मरणपत्र देऊनही कामात सुधारणा झाली नाही. त्यामुळे हे काम तातडीने थांबवा, अन्यथा नियमानुसार कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असा इशारा शहर अभियंता सुरेश इथापे यांनी दिला आहे.
महापालिकेकडून शहर व परिसरातील रस्त्यांच्या बाजूने रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे खांब उभे करण्यास परवानगी देण्यात आली होती. तत्कालीन आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी ऑगस्टमध्ये मंजुरी दिली. आयुक्तांच्या मंजुरीने महाराष्ट्र माहिती-तंत्रज्ञान महामंडळाने पांढरे खांब उभे करण्यास सुरुवात केली. खांब उभे करण्याचे काम सुरू करण्यापूर्वी मार्गांच्या नावासह नकाशा बांधकाम विभागाला सादर करण्याचे महामंडळाला कळविण्यात आले होते; मात्र महामंडळाने महापालिकेला कोणतीही माहिती न देता परस्पर काम सुरू केले. वास्तविक पाहता नगररचना विभागाशी चर्चा करून रस्त्यांच्या अंतिम रुंदीला खांब उभे करणे अपेक्षित हाेते. तसे बांधकाम विभागाने वेळोवेळी महामंडळाला पत्राद्वारे कळविले; परंतु महामंडळाने त्याची दखल घेतली नाही. शहरात पाहणी केली असता, जिओ कंपनीचे खांब रस्त्याच्या मध्यभागी उभे असल्याचे निदर्शनास आले आहे. हे खांब रस्त्याच्या रुंदीकरणात अडथळा ठरणार आहेत. महामंडळाने खोदाई केलेले अंतर उभारलेल्या खांबांची संख्या, ठिकाणे, मार्ग आदी माहिती देण्याबाबत कळविण्यात आले हाेते; मात्र ही बाब महामंडळाने गांभीर्याने घेतली नाही. कामात सुधारणा करावी, अन्यथा नियमानुसार कारवाई प्रस्तावित करण्यात येणार असल्याचे महामंडळाला स्मरणपत्राद्वारे कळविण्यात आले आहे.
...
- महापालिकेने स्मरणपत्र पाठविलेले आहे. याबाबत सरकारकडे खुलासा करण्यात आला आहे.
- मुकेश खरे, प्रतिनिधी,
....
- शहर व परिसरातील रस्त्यांत खांब उभे करण्यात आले आहेत. त्यामुळे रस्त्याच्या रुंदीकरणात अडथळा निर्माण होणार आहे. याबाबत महामंडळाला स्मरणपत्र देण्यात आले असून, कामात सुधारणा न झाल्यास नियमानुसार कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे.
- सुरेश इथापे, शहर अभियंता, महापालिका.