संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात स्टेट बँक वगळता इतर कोणतीही दुसऱ्या राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा नाही. बँकेचे १० हजारांवर खातेदार असून दररोज २० ते २५ लाख रूपयांची उलाढाल होत असते. कार्यरत कर्मचारी प्रामाणिक सेवा देत आहेत. मात्र रिक्त पदांमुळे कार्यरत कर्मचारीही हतबल झाले आहेत. या बँकेच्या ग्राहकांना खाते उघडण्यासाठी महिनाभर प्रतीक्षा करावी लागते. एखादे खाते बंद झाले तर ते सुरू करण्यासाठी पंधरा ते वीस दिवस लागतात. बँकेच्या वरिष्ठ प्रशासनाने कर्मचाऱ्यांवरील कामाचा वाढता ताण आणि ग्राहकांना तत्पर सेवा उपलब्ध मिळवून देण्याकरिता तातडीने वाढीव कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी ग्राहकांकडून जोर धरू लागली आहे. अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्राहकांनी दिला आहे. दरम्यान ग्राहकांच्या तत्पर सेवेबाबत स्टेट बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी साफ दुर्लक्ष केल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
....................
पीक कर्जासाठी महिन्यात चार वेळा हेलपाटे मारले आहेत. तरी देखील माझे पीक कर्ज अजून झाले नाही. साध्या स्टेटमेंटसाठी मला दोन दिवस प्रतीक्षा करावी लागली आहे. तेही अजून मिळाले नाही. येथील शाखा व्यवस्थापक यांचे काम चांगले आहे. मात्र,कर्मचारी संख्या कमी असल्याने कामाचा ताण त्यांच्यावर जास्त आहे. वरिष्ठांनी दखल घेऊन कर्मचारी संख्या वाढवावी.
- विक्रम साबळे,अकलापूर
................
दररोज आम्हाला जेवढे काम शक्य आहे ते आम्ही करत आहोत. ग्राहकांच्या सेवेसाठी दररोज बँकेचे कामकाज रात्री आठ ते नऊ वाजेपर्यंत सुरू असते. वरिष्ठांकडे कर्मचाऱ्यांची मागणी केली आहे.
- कांचन दाभाने, शाखा व्यवस्थापक, स्टेट बँक