जामखेड : जामखेड-बीड रस्त्यावरील रेडेवाडी फाट्याजवळ मंगळवारी (दि.१२) कावळा आणि कोकीळ पक्षी मृत सापडले होतेे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोन्ही पक्ष्यांचे स्वॅॅॅब तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवले होते. त्यापैकी कावळ्याचा अहवाल ‘बर्ड फ्लू’ पॉझिटिव्ह आला असल्याचे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी सांगितले.
जामखेडपासून चार कि.मी. अंतरावर रेडेवाडी फाट्यापासून १०० फूूट अंतरावर एक कावळा व कोकिळा यांचा तडफडून मृत्यू झाल्याची माहिती नितीन डोंगरे यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना दिली होती. त्यांनी घटनास्थळी भेट देऊन तत्काळ वनपरिमंडळ अधिकारी अनिल खराडे यांना दूरध्वनीद्वारे सांगितले. तेथे त्यांनी वनमजूर श्यामराव डोंगरे यांना पाठवले.
या वेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संजय गवारे यांना संपर्क साधण्यात आला. त्यांनी कावळ्याचे स्वॅब घेऊन पुण्याला प्रयोगशाळेत पाठविले होते. शनिवारी सकाळी हा मृत कावळ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे तालुक्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कुक्कुटपालन शेड आहेत. त्या सर्व ठिकाणी दक्षता म्हणून कुक्कुटपालन चालकांनी कोंबड्यांना लस टोचून घेतली आहे.
शहरातील मिलिंदनगरमध्ये एक पक्षी दिसून आला आहे. त्याला उडता येत नाही. याची माहिती वनविभागाला देण्यात आली.
----
एका कावळ्याचा मृत्यू झाला. त्याचा अहवाल बर्ड फ्लू पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहराच्या आसपास चार ते पाच कुक्कुटपालन केंद्रे आहेत. तेथे भेट दिली. पक्षी चांगले आहेत. सावधगिरी म्हणून तेथील पक्ष्यांचे स्वॅब घेऊन प्रयोगशाळेत पाठवले आहेत. या सर्व ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यास सांगितले आहे.
- डाॅ. अरुण गवारे,
पशुवैद्यकीय अधिकारी, जामखेड