अहमदनगर : जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी झालेल्या वादळ-गारपिटीने तब्बल आठ हजारांपेक्षा जास्त हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये जवळपास दहा हजार शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. अवकाळीने सात तालुक्यांमधील ५८ च्यावर गावे बाधित झाली आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
जिल्ह्यात २० आणि २१ मार्चला वादळ, वारा, मेघगर्जनेसह गारपीट झाली. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. श्रीरामपूर, शेवगाव, संगमनेर, पाथर्डी, राहुरी, नेवासा, कोपरगाव आणि श्रीरामपूर या सात तालुक्यांमधील ५८ च्यावर गावांना फटका बसला आहे. त्यामध्ये शेवगाव तालुक्यातील १६ गावांमधील १ हजार १५३ शेतकऱ्यांच्या ८५४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. संगमनेर तालुक्यात पाच गावांमधील ८७८ शेतकऱ्यांच्या १ हजार ३५७ हेक्टरवरील, पाथर्डी तालुक्यातील २४ गावांमधील ३०५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. राहुरी तालुक्यात ४ गावांमधील ६ हजार ५० शेतकऱ्यांच्या ३ हजार ७३० हेक्टरवरील, नेवासा तालुक्यातील ९ गावांमधील ५६६ हेक्टरवरील, कोपरगाव तालुक्यातील ७९० शेतकऱ्यांच्या ४९४ हेक्टरवरील, तर श्रीरामपूर तालुक्यातील २१८ शेतकऱ्यांच्या ११० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.
नुकसान झालेल्या पिकांमध्ये गहू, हरभरा, कांदा, मका, भुईमूग या पिकांचे नुकसान झाले. फळांमध्ये डाळिंब, अंबा, चिक्कू, पपई, खरबूज, टरबूज, द्राक्षे, केळी, पेरू या फळांचे व भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
दोन्ही दिवशी पिकांचे, फळांचे नुकसान झाल्यानंतर कृषी विभाग, महसूल विभाग आणि जिल्हा परिषद यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली असून, पंचनामेही करण्यात आली आहेत.