नेवासा फाटा : नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथील एका व्यक्तीच्या खूनप्रकरणी मयताच्या तिघा सख्ख्या भावांवर सोमवारी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना जमिनीच्या वादातून २० डिसेंबर रोजी दुपारी घडली.
नईम अब्दुल लतीफ देशमुख (वय ५५, रा. भानसहिवरा, हल्ली राहणार गरीब नवाज मशीद जवळ, मुकुंदनगर, अहमदनगर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मयताचा मुलगा साहील नईम देशमुख याच्या फिर्यादीवरून वडिलांचे सख्खे भाऊ नदीम अब्दुल लतीफ देशमुख, मोईन अब्दुल लतीफ देशमुख, रफीक अब्दुल लतीफ देशमुख या तिघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
नईम देशमुख यांची भानसहिवरा येथे शेत गट नंबर ३१३ मध्ये वडिलोपार्जित अडीच एकर जमीन आहे. ती जमीन नईम यांचे वडील अब्दुल लतीफ देशमुख यांच्या नावावर आहे. अब्दुल देशमुख यांना चार मुले आहेत. त्यांचे निधन झालेले आहे. काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊन झाले. त्यात काम बंद असल्याने कर्ज झाल्याने नईम यांनी त्यांच्या चार भावांना सध्या शेती करू द्या. कर्ज संपले की शेती पुन्हा तुम्हाला देवून टाकतो, असे सांगितले. मात्र रफीक, मोईन, नदीम यांनी या भावांनी शेती करण्यास विरोध केला होता. जमिनीचे वाटप करावे असे त्यांचे म्हणणे होते. रविवारी सकाळी नईम यांच्या मोबाईलवर नदीम यांनी फोन केला होता. त्यानुसार ते जमीन वाटपासाठी आले होते. जमीन वाटपावरून वाद झाल्याने रफीक, मोईन, नदीम यांनी नईम यांना मोठमोठ्याने शिवीगाळ करीत लाकडी दांडके, सुरीने मारहाण केली. जखमी नईम यांना नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून नईम यांना उपचारासाठी अहमदनगर येथे नेण्यास सांगितले. तेथे डॉक्टरांनी त्यांना तपासून उपचारापूर्वीच मयत घोषित केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.