शेवगाव : तालुक्यातील प्रभूवाडगाव येथील महिला ग्रामसेवकाला धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी वाळू वाहतूक करणारा दत्तात्रय जायभाय याच्या विरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी संचिता शामूवेल दळवी यांनी फिर्याद दिली आहे. शनिवारी (दि.५) सायंकाळी पाचच्या सुमारास प्रभूवाडगाव येथे शिवस्वराज्य दिनाची तयारी करण्यासाठी त्या चालल्या होत्या. त्यावेळी त्यांना तेथील ग्रामपंचायत शिवारातील शेती गट नं. १३९ मध्ये गावासाठी नियोजित चालू असलेल्या विहिरीच्या कामाजवळ खोदून ट्रॅक्टरमध्ये वाळू भरली जात असल्याचे निदर्शनास आले. ही जागा ग्रामपंचायतीची आहे. येथे खड्डे खोदून वाळू वाहतूक करू नका, असे ग्रामसेविका दळवी म्हणाल्या.
त्यावर वाळू वाहतूकदार दत्तात्रय जायभाय याने ही जागा तुमच्या बापाची आहे का, असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी केली. त्यानंतर त्यास येथून ट्रॅक्टर घेऊन जाऊ नकोस, असे ग्रामसेविकेने सांगितले. यावेळी ग्रामसेविकेने तहसीलदारांना मोबाइलवर संपर्क साधून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. याचा राग आल्याने जायभाय याने ग्रामसेविकाला धक्काबुक्की केली. यात ग्रामसेविकेचे मंगळसूत्र गहाळ झाले. यावेळी जायभाय याने मारहाण, दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिली, असे ग्रामसेविकेने फिर्यादीत म्हटले आहे. या मारहाणीत ग्रामसेवक दळवी जखमी झाल्याने त्यांना मनोहर अंगरखे व ग्रामपंचायत शिपाई गोरक्ष बटुळे यांनी शेवगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते.