श्रीगोंदा : गेल्या काही दिवसांत ग्रामीण भागातही विदेशी श्वानांची क्रेझ वाढत आहे. त्यामुळे जर्मन शेफर्ड, लॅब्रेडोर, रॉटविलर, पामेरियन, मुधोल, हाउंड, डॉबरमॅन, ग्रेट डेन, अमेरिकन पीट बुल अशा विविध जातींचे श्वान गावागावात दिसत आहेत. त्या तुलनेत देशी श्वानांकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे.
ग्रामीण भागात देशी श्वानांचे महत्त्व अधिक होते. येथे देशी श्वानांचेच पालन केले जात असे. त्यांना घराच्या उंबऱ्याच्या आत प्रवेश नसतो. त्यांनी दारातच बसायचे व मालकाची राखण करायची. त्यांना दूध, भाकरी, चपाती असे खाद्यमालकांकडून दिले जाते. मात्र विदेशी श्वानांसारखी काळजी घेतली जात नाही. सध्या विदेशी श्वान कोठेही अगदी सहज उपलब्ध होऊ लागले आहे. त्यातच बहुतांश ग्रामीण भागही निमशहरी झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ विदेशी श्वानांचे पालन करू लागले आहेत. विदेशी श्वानांची किमतही २० हजारांपासून ते दीड लाखापर्यंत आहे. विदेशी श्वानाचा आहार, व्यायाम, लसीकरण असा खर्चही मोठा असतो. याचाही खर्च अनेकजण करत आहेत. त्यामुळे सध्या तरी ग्रामीण भागातही विदेशी श्वानांची क्रेझ वाढताना दिसते.
-----
काष्टीत दुर्मिळ श्वान..
काष्टी येथील श्रीकांत पाचपुते यांच्याकडे ‘मुधोळ हाउंड’ या दुर्मिळ जातीचे श्वान आहे. हे श्वान पूर्वीच्या काळी राजे-महाराजे शिकारीसाठी वापरत असत. श्रीकांत यांनी कन्याकुमारी येथून हे श्वान आणले आहे.
----
..तरुणांना रोजगार मिळेल
श्वान खरेदी-विक्रीत तरुणांनी पुढाकार घ्यायला हवा. व्यावसायिक दृष्टीने विचार करायला हवा. त्यातून होतकरू तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. विदेशी श्वानांमुळे देशी श्वानांच्या खरेदी-विक्रीवर फारसा फरक पडलेला नाही. देशी श्वानांमध्ये रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे. ते आजाराला कमी प्रमाणात बळी पडतात. त्यामुळे अनेक जण आजही त्यांनाच प्राधान्य देतात.
-डॉ. संतोष जठार,
काष्टी
----
विदेशी श्वानांचा भाव असा..
लॅब्राडॉर-१५ ते २५ हजार, जर्मन शेफर्ड-१५ ते ३० हजार, डॉबरमॅन-१० ते ३० हजार, युरोपियन डॉबरमॅन-१ ते दीड लाख.
---
२८ श्रीगोंदा श्वान
श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामीण भागातही असे विदेशी श्वान दिसू लागले आहेत.