शेवगाव : येथील ग्रामीण रुग्णालयात गरोदर मातांसाठी कोविड १९ लसीकरण शिबिराचे आयोजन नुकतेच केले होते. यावेळी १०१ गरोदर मातांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक रामेश्वर काटे यांनी दिली.
शिबिरास आमदार मोनिका राजळे यांनी भेट देऊन लसीकरण करण्यात आलेल्या सर्व गरोदर मातांना मार्गदर्शन केले. राजळे म्हणाल्या, कोविड लसीकरणाबाबत अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत. मात्र मनात कोणतीही भीती न बाळगता गरोदर महिलांनी लसीकरण करून घ्यावे. लस पूर्णतः सुरक्षित आहे. तहसीलदार अर्चना पागिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर आयोजित करण्यात आले होते.
यावेळी आमदार राजळे यांनी रुग्णालयातील ऑक्सिजन प्रकल्प आणि शासकीय कोविड केअर सेंटरला भेट देऊन आवश्यक त्या सूचना दिल्या. शिबिर यशस्वीतेसाठी गटविकास अधिकारी महेश डोके, डॉ. दीपक परदेशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संकल्प लोणकर, डॉ. कैलास कानडे, डॉ. अतुल शिरसाठ, गायत्री कुमावत, संचिता तुपे, सुशील बडे, संदीप घुले, अजिंक्य महालकर, अमोल काळे, सोनम जायभाये, कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी आदींनी प्रयत्न केले.