देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे आरोग्य विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यामुळे लसीकरणापासून वंचित राहिलेल्या व १८ ते ४५ वयोगटाकरिता कोरोना लस उपलब्ध झाल्याने २५८ लोकांचे लसीकरण होऊ शकले.
यामध्ये ४५ वर्षांपुढील ७० नागरिकांना दुसरा डोस, तर १८ ते ४५ वयोगटातील १८८ नागरिकांना पहिला डोस यावेळी देण्यात आला. तसेच फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांचे तसेच वंचित राहिलेल्या नागरिकांचे लसीकरण झाल्याने आरोग्य विभागाला ग्रामस्थांनी धन्यवाद दिले. लसीकरणाचा संदेश सकाळी ८ वाजता मिळाल्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात तरुणांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. उद्योजक अतुल लोखंडे, कुकडी कारखान्याचे संचालक सुभाष वाघमारे, सदस्य अमोल वाघमारे, डॉ. भाऊसाहेब जाधव, मच्छिंद्र गुंजाळ केंद्रावर उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य निलेश गायकवाड, तुषार वाघमारे, सुधीर ढवळे, प्रमोद बनकर यांनी रजिस्ट्रेशनसाठी मदत केली.
देवदैठण उपकेंद्राच्या आरोग्य सेविका जयश्री सरोदे, सुनीता यादव यांनी लसीकरणाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. यावेळी डॉ. जयदेवी राजेकर, दीपक गोधडे, प्रशांत सहस्त्रबुद्धे, शिवाजी गायकवाड, प्रदीप जगदाळे, मदतनीस राधा ढोबळे, लता वाघमारे, आशा सेविका वैशाली साठे, मनिषा ढवळे, सारिका भालेकर, मंगल वेताळ, मीरा चाहेर, नलिनी वाळूंज यांनी लसीकरण प्रक्रियेत मोलाची मदत केली.