कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. ‘ब्रेक दि चेन’च्या माध्यमातून घालून दिलेल्या निर्बंधाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात दंडात्मक करवाई करण्यात येत आहे. असे असताना आता विनाकारण घराबाहेर पडून रस्त्यांवर फिरत कोरोना संसर्गाला कारणीभूत ठरण्याची शक्यता असणाऱ्यांची फिरत्या पथकाद्वारे कोरोना चाचणी करण्यात येत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात येत आहे. पोलीस, महसूल व संगमनेरनगर परिषदेच्या पथकाने संयुक्तरीत्या कारवाई केली. मालदाड रस्ता, संगमनेर बसस्थानक परिसर, नाशिक रस्ता येथे ही कारवाई करण्यात आली. विनाकारण फिरणाऱ्यांना ताब्यात घेत तसेच भाजी विक्रेते अशा एकूण १५० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात चारजण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यांना संगमनेर नगरपरिषदेच्या कुटीर रुग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात आले.
------------------
उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद
विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची संगमनेर बसस्थानक परिसरात कोरोना चाचणी करण्यात येत होती. त्यावेळी काही नागरिकांनी तेथे स्वत: येऊन आमची पण कोरोना चाचणी करा, अशी विनंती केली. फिरत्या पथकाद्वारे कोरोना चाचणी करण्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळतो आहे. अनेकजण कोरोना चाचणी करून घेण्यासाठी स्वत:हून पुढे येत आहेत, असे संगमनेर नगर परिषदेचे सतीष बुरूंगुले यांनी सांगितले.