संगमनेर : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणानंतर अनेकांना ताप येणे. डोके, हात-पाय दुखणे किंवा इतर लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे घेतलेल्या लसीचा परिणाम होईल अथवा नाही, याबाबत अनेकजण साशंक दिसून येतात. मात्र, कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेणे, हाच सुरक्षित उपाय असून, लस परिणामकारक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोणत्याच प्रतिबंधात्मक लसीकरणामुळे कोणताच आजार होत नाही. लसीकरण हे आजार होऊ नये अथवा आजार झाल्यास त्याचे दुष्परिणाम कमी प्रमाणात व्हावेत, याकरिता केलेली प्रतिबंधात्मक उपाययोजना आहे. भारतात क्षयरोग, पोलिओ, गोवर, कावीळ ब, स्वाइन फ्लू या आजारांवरील लसी देण्यात येतात. सध्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू आहे. ते सुरक्षित असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह होत असल्याच्या अफवा काही महिन्यांपूर्वी समोर आल्या होत्या. त्यामुळे गैरसमजातून अनेकांनी लसीकरण करून घेण्याकडे पाठ फिरवली होती. लसीकरणानंतर कोरोना पॉझिटिव्ह होणे, ही निव्वळ अफवा असल्याचे संगमनेर उपविभागाचे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कचेरिया यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
कोरोनावर लसीकरण हाच एकमेव उपाय मानला जातो आहे. ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच लसीकरण केंद्रांवर कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोफत करण्यात येते आहे. काही खासगी रुग्णालयांमध्ये शुल्क आकारून कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जाते. मात्र, लस घेतलेल्या अनेकांना ताप येणे. डोके, हात-पाय दुखणे किंवा इतर लक्षणे दिसून आली नाहीत. त्यामुळे त्रास झाला नसल्याने ते साशंक असतात. याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांच्या शरीरात रोगप्रतिकारक क्षमता अधिक असावी, त्यामुळे त्यांना कुठलाही त्रास झाला नसावा. कुठलीही कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्यावी, ती परिणामकारक आहे.
---------------
कोव्हॅक्सिन लस घेतली. मात्र, मला काहीही त्रास जाणवला नाही. कुटुंबातील इतर सदस्यांनीदेखील लस घेतली, त्यांनादेखील कुठला त्रास झाला नाही. कोरोना प्रतिबंधात्मक लस परिणामकारक आहे. लसीचा दुसरा डोसदेखील घेणार आहे.
विनोद मनोहर सूर्यवंशी, संगमनेर
-------------
दोन आठवड्यांपूर्वी कोविशिल्ड लस घेतली. परंतु कुठलाही त्रास जाणवला नाही. लस घेऊन पुन्हा लगेचच कामावर आलो. लसीकरण करून घेणे फायदेशीर असून, कुटुंबातील सदस्यांचेदेखील लसीकरण झाले आहे.
अमोल दत्तात्रय शिरोळकर, संगमनेर
-----
त्रास झाला तरच कोरोना प्रतिबंधात्मक लस परिणामकारक आहे, असे अजिबात नाही. प्रत्येकाच्या शरीराची परिणामकारकता वेगळी आहे. कोरोना प्रतिबंधात्मक दोन्ही लस या सुरक्षित आणि प्रभावी आहेत. मात्र, लसीकरणानंतरही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे.
डॉ. संदीप कचेरिया, वैद्यकीय अधिकारी, घुलेवाडी ग्रामीण रुग्णालय, संगमनेर
---------
अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत झालेले लसीकरण
पहिला डोस - १४,६५,६३६
दुसरा डोस - ५,४६,४५३
एकूण लसीकरण - २०,१२,०८९
...............
star 1148