लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : जिल्ह्यामध्ये कोरोनाने आतापर्यंत जवळपास सहा हजार जणांचा बळी घेतला आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेतील कोरोनाने झालेल्या मृत्यूंची संख्याच सर्वाधिक आहे. खासगी रुग्णालयांनी पोर्टलवर नोंद पाठविली नसल्याने तब्बल दीड हजार मृत्यूंची नोंदच झाली नव्हती. ती नोंद गत पंधरा दिवसांपासून घेण्यात आल्याने एकूण मृत्यूंचा आकडा सहा हजारांच्या जवळपास गेला असल्याचे उघड झाले आहे.
कोरोनाची दुसरी लाट तीव्र होती. पहिल्या लाटेनंतरचा निष्काळजीपणा मोठ्या प्रमाणावर नागरिकांना भोवला. गर्दी, लग्न समारंभ वाढले. प्रवास वाढला, नियमांमध्ये शिथिलता आली. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला. मार्च-एप्रिल-मे- २०२१ या तीन महिन्यांत कोरोनाने अक्षरश: कहर केला. दररोज चार हजार रुग्ण पॉझिटिव्ह असल्याने खासगी आणि सरकारी रुग्णालयातही रुग्णांवर उपचार करण्यासाठी जागा शिल्लक राहिली नाही. नगरच्या अमरधाम स्मशानभूमीत रोज ४० ते ५० जणांवर अंत्यसंस्कार झाले. यावेळी मात्र प्रत्यक्षात आकडेवारी २० ते २५ इतकीच नोंद केली जात होती. मात्र, कोरोनाची तीव्रता संपल्यानंतर मृत्यूचे ऑडिट करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यानंतर जिल्ह्यात तब्बल दीड हजार मृत्यूंची नोंद झालीच नव्हती, असे निदर्शनास आले. ही नोंद घेतल्याने जिल्ह्यातील मृत्यूंचा आकडा सहा हजारांच्या जवळ पोहोचला आहे. पहिल्या लाटेत ग्रामीण भागात ४८ हजार रुग्ण होते, तर दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात १,३६,००० इतके रुग्ण होते.
--------------
लाट पॉझिटिव्ह मृत्यू
पहिली ७५००० ११४३
दुसरी २,०६,००० ४७९७
--------------
दुसऱ्या लाटेत असा वाढला कोरोना (२०२१)
महिना पॉझिटिव्ह मृत्यू
फेबु्वारी ३६४५ ५९
मार्च १९,०४१ २७६
एप्रिल ८०,११८ १,९६४
मे ८७,०९५ २,११४
जून १७,७१९ ३८७
जुलै २६७४ १९
एकूण २, १०, २९२ ४८१९
------------------
---------------
तालुकानिहाय मृत्यू
नगर शहर- १४६७
नगर ग्रामीण-५९२
राहाता-३९६
श्रीगोंदा-३८६
संगमनेर-३८१
श्रीरामपूर-३२२
पारनेर-३०८
नेवासा-२८३
कर्जत-२१५
पाथर्डी-२१०
शेवगाव-२१०
जामखेड-२०५
कोपरगाव-१९१
इतर जिल्हा-१७४
अकोले -१५०
भिंगार-८९
इतर राज्य-१
एकूण-५९४०
---------------
मे- २०२१ मध्ये सर्वाधिक २११४, एप्रिल-२०२१ मध्ये १९६४ इतके सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत झालेल्या मृत्यूंची संख्या पाचपट आहे. आरोग्य विभागाच्या पोर्टलवर मृत्यूची नोंद करण्यासाठी खासगी रुग्णालयांनी पासवर्ड घ्यावा लागतो. तो पासवर्ड न घेतल्याने त्यांना पोर्टलवर नोंद करण्यास उशीर झाला. तसेच मार्च ते जून-२०२१ मध्ये आरोग्य यंत्रणेवर कामाचा ताण असल्याने नोंद झाली नव्हती, ती नोंद जुलैमध्ये पूर्ण करण्यात आली. त्यात दीड हजार मृत्यूंची तफावत आढळून आली. म्हणजे एवढ्या मृत्यूची नोंद झाली नव्हती.
-डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा शल्य चिकित्सक, अहमदनगर
-