केडगाव : जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या ऑनलाइन सर्वसाधारण सभेत सत्ताधारी व विरोधी संचालकांमध्येच वादावादी झाली. कर्मचाऱ्यांचे प्रमोशन, जामीनदारांची अडचण, नव्या शिक्षकांना सभासदत्व देणे, मयत निधी आदी मुद्द्यांवरून संचालकांमध्ये वादंग झाले. दरम्यान, जामीन कर्जाची मर्यादा १६ लाख करण्याचा विषय मंजूर करण्यात आला.
जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीची ७८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष चांगदेव खेमनर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी संचालक मंडळ वगळता सर्व सभासदांनी यात ऑनलाइन सहभाग घेतला. सचिव स्वप्नील इथापे मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन करीत असतानाच विरोधी संचालक आप्पासाहेब शिंदे त्यास हरकत घेत इतिवृत्तात सूचना मांडणाऱ्या सभासदांचे नावे का वगळण्यात आली, असा प्रश्न उपस्थित केला. शिंदे यांनी कर्जमर्यादा १६ ऐवजी १८ लाख करण्याची सूचना मांडली. मात्र, ज्येष्ठ संचालक प्रा. भाऊसाहेब कचरे यांनी संस्थेची आर्थिक कुवत विचारात घेऊनच टप्प्याटप्प्याने कर्जमर्यादा वाढविण्यात येत आहे, असे उत्तर दिले.
सभासद रमजान हवालदार यांनी ज्यांना आर्थिक लाभ मिळाला नाही, अशा कोरोनामुळे मयत शिक्षकांच्या वारसांना आर्थिक मदत करण्याची मागणी केली. शिंदे यांनी हाच मुद्दा उचलत त्यांच्या वारसांना नोकरभरतीत प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली. मात्र, जे मयत झाले ते आपले सभासद असतील, तरच त्यांचा भविष्यात विचार करू, असे स्पष्टीकरण दिले. सभासद सुनील दानवे यांनी मयत निधीची रक्कम वाढवण्याऐवजी ती इतर तरतुदीतून करावी, अशी मागणी करून सभासदांवर आर्थिक भार नको, अशी मागणी केली. प्रा. कचरे यांनी नफ्यातून अशी तरतूद करता येत नसल्याचे उत्तर दिले. तसेच त्यांनी उपस्थिती भत्ता व प्रवास भत्ता यावर प्रश्न विचारल्याने सत्ताधारी संचालक व दानवे यांच्यात वादावादी सुरू झाली. संचालक फक्त २७५ रुपये बैठकीचा भत्ता घेतात, असा खुलासा कचरे यांनी केला.
जामीनदारांच्या प्रश्नावरून प्रा. कचरे म्हणाले, सभासद म्हणून आपण ज्यांना जामीनदार होतो, त्यावेळी त्याची वसुली व सेवा कार्यकाळ पाहावा. विरोधी संचालक बाबासाहेब बोडखे यांनी ही शाखाधिकाऱ्यांची जबाबदारी असल्याची सूचना मांडली. यानंतर विरोधी संचालक आप्पासाहेब शिंदे यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रमोशनाचा मुद्दा उपस्थित केला. प्रमोशन देताना सत्ताधारी जवळचा नातेवाईक पाहून प्रमोशन देतात, असा आरोप केल्याने सत्ताधारी व विरोधी संचालकांमध्ये वादंग सुरू झाले. यावर कचरे यांनी तुम्ही संचालक आहात ना, मग तुम्ही असताना याला विरोध का केला नाही. संस्था प्रमोशन देताना गुणवत्ता पाहूनच प्रमोशन देते. ज्यांनी प्रमोशन घेण्यास नकार दिला, त्यांना प्रमोशन नाकारून पुढच्यांना दिले. हे सर्व नियम पाहूनच केले, असा खुलासा कचरे यांनी करूनही संचालकांमध्ये वादावादी सुरूच राहिली. विरोधी संचालक महेंद्र हिंगे, बोडखे यांनीही शिंदे यांना साथ दिल्याने वादावादी वाढत गेली.
----
सभासदांऐवजी संचालकांमध्येच झाली चर्चा
सर्वसाधारण सभा असूनही आजची सभा संचालकांच्या मासिक बैठकीप्रमाणे पार पडली. साडेअकरा हजार सभासदांमधून बोटांवर मोजता येईल इतक्याच सभासदांना बोलण्याची संधी मिळाली. बहुतांशी सभा सत्ताधारी व विरोधी संचालक यांच्या वादावादीतच पार पडली.