केडगाव : ज्या लोकांनी स्वतःच्या नेत्यांना, पक्षाला आणि कार्यकर्त्यांना फसवले, पाठीत खंजीर खुपसला, अशा विश्वासघातकी आणि बदनाम लोकांकडून नगर बाजार समितीला बदनाम केले जात आहे. बाजार समितीवर आजवर अनेक आरोप झाले, चौकशा लागल्या पण प्रत्येकवेळी बाजार समिती निर्दोष सिद्ध झाली. यावेळीही तसेच होईल. राजकीय आणि सरकारच्या दबावाखाली ही नोटीस पाठविण्यात आली असून, त्याला योग्य आणि कायदेशीर उत्तर दिले जाईल, अशी माहिती बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे यांनी दिली.
नगर बाजार समितीवर गैरव्यवहाराचे विरोधी महाविकास आघाडीने आरोप करत चौकशी करण्याची मागणी केली होती. त्याची चौकशी समितीने चौकशी करत बाजार समितीला कारणे दाखवा नोटीस बजावली. यावर विरोधकांनी बाजार समितीवर पत्रकार परिषदेत आरोप केले होते. बाजार समितीच्या संचालक मंडळाने पत्रकार परिषद घेऊन विरोधी महाविकास आघाडीच्या नेत्यांचा समाचार घेतला. यावेळी उपसभापती संतोष म्हस्के, माजी उपसभापती रेवणनाथ चोभे उपस्थित होते.
बाजार समितीवर आरोप करणाऱ्यांची विश्वासार्हता काय आहे. महाआघाडीच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांनी किती कार्यकर्त्यांना कामे दिली, रोजीरोटी दिली ते जनतेसमोर येऊन सांगावे. स्वतः हे सर्व ठेकेदारी करतात आणि जनतेच्या हिताचा आव आणतात. महाआघाडीचे नेते म्हणणारे अनेकजण छुप्या पद्धतीने माजी मंत्र्यांना येऊन भेटतात. आघाडीच्या या नेत्यांचा खरा चेहरा कार्यकर्त्यांना आणि लोकांना समजला आहे. त्यांचेच कार्यकर्ते आमचा फक्त निवडणुकीपुरता वापर केला गेला, असे उघडपणे म्हणू लागले आहेत. त्यामुळे स्वतःचा विश्वासघातकीपणा आणि बदनामी झाकण्यासाठी आणि लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी बाजार समितीला ते बदनाम करत आहेत. बाजार समितीमध्ये वातावरण तापवायचे, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उभे करायचे आणि अखेरच्या टप्प्यात हातचे राखून काम करत पॅनल पाडायचे, असे काम ते करतात, अशी टीका घुगे, म्हस्के, चोभे यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, गोविंद मोकाटे यांच्यावर केली.
यावेळी माजी सभापती हरिभाऊ कर्डिले, विलासराव शिंदे, दिलीप भालसिंग, बन्सी कराळे, बाळासाहेब निमसे, बाबासाहेब खर्से, शिवाजी कार्ले, बबनराव आव्हाड, बाबासाहेब जाधव, उद्धव कांबळे, वसंतराव सोनवणे, संतोष कुलट, बहिरू कोतकर आदी उपस्थित होते.