अहमदनगर : पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या विरोधात सोमवारी नगर शहरामध्ये काँग्रेसने मोर्चा काढून मोदी सरकारचा निषेध केला. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी घोड्यावरून बाजारपेठेत फेरफटका मारून भाववाढीकडे लक्ष वेधले.
काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या विरोधामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या आदेशावरून आंदोलने करण्यात आली. नगर शहरामध्ये किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली सर्जेपुरातील सबलोक पेट्रोलपंपाच्या ठिकाणी निदर्शने करण्यात आली. यावेळी ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब धोंडे, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, उपाध्यक्ष खलील सय्यद, विद्यार्थी काँग्रेसचे प्रभारी अनिस चुडीवाला, क्रीडा काँग्रेसचे अध्यक्ष प्रवीण गिते पाटील, युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड. अक्षय कुलट, विद्यार्थी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष वीरेंद्र ठोंबरे, नगर तालुका विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष सुजित जगताप, इंटक जिल्हाध्यक्ष हनीफ शेख, सेवादल महिला शहर जिल्हाध्यक्ष कौसर खान, सेवादल शहर जिल्हाध्यक्ष डॉ. मनोज लोंढे शहर जिल्हा सरचिटणीस नलिनी गायकवाड, जरिना पठाण, अल्पसंख्याक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख, शहर जिल्हा सचिव प्रशांत वाघ, शहर जिल्हा सचिव मुबिन शेख, खजिनदार मोहनराव वाखुरे आदी आंदोलनात सहभागी झाले होते.
पेट्रोलपंपाजवळ निदर्शने झाल्यानंतर काँग्रेसच्या वतीने नगर शहरातील बाजारपेठेमध्ये घोड्यावरून भाजप सरकारच्या विरोधामध्ये सर्जेपुरा ते एमजी रोडवरील घास गल्ली चौकापर्यंत प्रतीकात्मक मिरवणूक काढण्यात आली. या घोड्यावर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे बसले होते. त्यांनी मोदी सरकारच्या विरोधामध्ये दरवाढीच्या विरोधात घोषणा दिल्या. तसेच कार्यकर्त्यांनी दुचाकी गाड्या लोटत सरकारच्या विरोधात आपला रोष व्यक्त केला. यावेळी किरण काळे म्हणाले, पेट्रोलचे दर १०० रुपयांच्या पुढे गेले आहेत. डिझेलचा भाव ९२ रुपयाला येऊन ठेपला आहे. स्वयंपाकाच्या गॅसचे दर ९०० रुपयांच्या पुढे गेले आहेत. मोदी सरकारने कोरोना संकट काळामध्ये मोठ्या प्रमाणावर डिझेल, पेट्रोल, गॅस यांच्यावरती कर लादत लाखो-कोटी रुपयांचा नफा मिळवला असून, सामान्य माणसाला मात्र महागाईच्या खाईत मध्ये ढकलले आहे. यावेळी मनोज गुंदेचा, खलील सय्यद, अनंत गारदे, अनिस चुडीवाला आदींची भाषणे झाली. यावेळी पेट्रोलपंपावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी गांधीगिरी केली. पेट्रोल भरणाऱ्या नागरिकांना गुलाबाचे फूल दिले.
..............................
फोटो : पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या विरोधात सोमवारी नगर शहरामध्ये काँग्रेसने मोर्चा काढला. यावेळी घोड्यावरून फेरफटका मारताना शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे. (छायाचित्र : साजिद शेख)