अहमदनगर : राज्य शासनाने कारखान्यांना लॉकडाऊनमधून वगळले आहे. परंतु, कामगारांची आरटीपीसीआर चाचणी व लसीकरण करण्याचे निर्देश असून, या आदेशाबाबत उद्योजकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे याबाबत उद्योजकांनी उद्योग मंत्रालयाकडून मार्गदर्शन मागविले आहे.
राज्य शासनाने नव्याने लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमधून कारखान्यांना वगळले आहे. कामगारांच्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत उद्योजकांना आदेश दिला आहे. कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांची आरटीपीसीआर चाचणी करून अहवाल सोबत ठेवणे बंधनकारक आहे. परंतु, चाचणी केल्यानंतर अहवाल किती दिवसांचा ग्राह्य धरणार, असा प्रश्न आहे. चाचणी केल्यानंतरही कामगाराला कोरोनाची लागण झालीच तर काय, असे उद्योजकांचे म्हणणे आहे. याशिवाय ४५ वर्षांवरील सर्वांना कोरोनावरील लस दिली जात आहे. परंतु, कारखान्यांतील बहुतांश कामगारांचे वय त्यापेक्षा कमी आहे. असे असताना या कामगारांना आरोग्य विभाग लस देणार का, असाही उद्योजकांचा प्रश्न आहे. कामगारांची चाचणी व लसीकरणाबाबत उद्योजकांमध्ये संभ्रम असल्याने प्रशासनाशी याबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले.
....
- कारखान्यांना लॉकडाऊनमधून वगळण्यात आले आहे. कामगारांची नियमित ऑक्सिजन व तापमानाची तपासणी करण्यात येते. त्यात आता शासनाने चाचणी लसीकरण करणे बंधनकारक केले आहे. परंतु, चाचणी दर १५ दिवसांनी करावी किंवा कसे, याबाबत संभ्रम आहे. तसेच लसीकरणाबाबतही संभ्रम आहे. कामगारांना सोबत ओळखपत्र ठेवण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.
- राजेंंद्र कटारिया, अध्यक्ष, आमी संघटना