अहमदनगर : जिल्ह्यात सरासरी रोज दोन हजार जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. त्यामुळे सर्वच शासकीय आणि खासगी कोविड हॉस्पिटल, कोविड सेंटरमध्येही रुग्णांचे हाल होत आहेत, तर त्यांना व्यवस्थित सेवा मिळते की नाही हे पाहण्यासाठी त्यांच्या नातेवाइकांची तगमग सुरू आहे. काही नातेवाईक रुग्णांना भेटण्याचा आग्रह धरीत असून, यामुळे हॉस्पिटल प्रशासन, परिचारिका आणि नातेवाईक यांच्यात वाद होत आहेत.
जिल्ह्यात अहमदनगर शहर, राहाता, संगमनेर, कोपरगाव, राहुरी, पाथर्डी, कर्जत आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. सर्वात जास्त कोविड हॉस्पिटल नगर शहरात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातून नगरमधील हॉस्पिटलमध्ये रुग्णांची गर्दी वाढत आहे. अनेकांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड मिळत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे बाधित रुग्णांवर व्यवस्थित उपचार होतात की नाही हे पाहण्यासाठी नातेवाईकही रुग्णालयाबाहेर थांबून असतात. अनेक जण रुग्णांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात. काहींना जेवणाचा घरचा डबाही द्यावा लागतो. घरातून आणलेले साहित्य रुग्णांपर्यंत देण्यासाठी तासन्तास ते रुग्णालयाबाहेर बसून असतात.
-----------
जिल्हा रुग्णालयाच्या आवारातही गर्दी
जिल्हा रुग्णालयात पाचशेच्या आसपास रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णालयाच्या परिसरात रुग्णांचे नातेवाईक घुटमळत असतात. कोरोना वाॅर्डमध्येही जनरल वाॅर्डसारखी अवस्था आहे. रुग्णांना भेटू दिले नाही तर परिचारिका, डॉक्टर, कर्मचाऱ्यांशी नातेवाईक वाद घालत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
-------------
डमी
नेट फोटो-
११ रिलेटिव्ह ऑफ कोरोना डमी
---------
कोणाला द्यायचाय जेवणाचा डबा....कोणाला पाहायचेय रुग्णाला (प्रतिक्रिया)
कोविड रुग्णालयात नातेवाइकाला दाखल केले आहे. मात्र, रुग्णालयात कसल्याही सुविधा नाहीत, असा फोन आल्यामुळे इथे आलो आहे. जेवण मिळते, मात्र त्याला कसलीच चव नाही, असे आतून सांगितले जाते. त्यामुळे घरून डबा आणला आहे. मात्र आतमध्ये जाऊ देत नाहीत.
- एक नातेवाईक (राहुरी)
-------------------
चार-पाच दिवसांपासून रुग्ण उपचार घेत आहे. त्याची परिस्थिती कशी आहे, हे समजत नाही. त्यासाठी आम्ही थांबून आहोत. रुग्णाशी फोनवर बोलतो, मात्र आज त्याचा आवाज थोडा बारीक झाला होता. त्यामुळे काळजी वाटली म्हणून रुग्णालयाच्या बाहेर थांबलेलो आहे. घरातून आणलेले जेवण त्याला द्यायचे आहे. तिथे स्वच्छता असते की नाही, याची काळजी असल्याने एकदा आतमध्ये जाऊन पाहायचे आहे.
दुसरा नातेवाईक (पाथर्डी)
----------------
खासगी कोविड केअर सेंटरमध्ये रुग्ण उपचार घेत आहे. मात्र, इथे बिल मोठ्या प्रमाणावर लावले जाते. त्या प्रमाणात सुविधा मिळतात की नाही, हे पाहण्यासाठी बाहेर थांबलो आहे. मात्र, आम्ही केवळ काउंटरवरच चौकशी करू शकतो. वरच्या मजल्यावर जाऊ दिले जात नाही. रुग्णाला नाश्ता मिळतो की नाही, वेळेवर जेवण मिळते की नाही, हे पाहण्यासाठी इथे थांबलो आहे. रुग्णाची काळजी वाटते. ऑक्सिजनची कमतरता असली तर तो दिला जातो की नाही, याचीही काळजी असते.
-तिसरा नातेवाईक (शेवगाव)
---------------
फोटो