संगमनेर : ‘तोंडाला मास्क असेल तरच दुकानात प्रवेश’, ‘येथे थुंकू नये, थुंकल्यास पाचशे रुपये दंड केला जाईल’, अशा पाट्या आता बहुतांश दुकानांबाहेर लावलेल्या दिसतात. कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू नये, याची काळजी घेतली जाते आहे. त्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियमांचे पालन मोबाइल दुकाने, मोबाइल केअर सेंटरमध्ये करण्यात येत असून
येथे येणाऱ्या ग्राहकांसाठी काही वेगळे नियमदेखील घालून देण्यात आले आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वाढता संसर्ग रोखण्याकरिता ‘ब्रेक द चेन’च्या माध्यमातून कडक निर्बंध घालून दिले होते. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्वच दुकाने दीड महिने बंद होती. या काळात अनेकांचे मोबाइल खराब झाले. ते त्यांना दुरुस्त करायचे होते. काहींना नवीन मोबाइल घ्यायचे होते. कुणाला मोबाइल कव्हर, कुणाला स्क्रीन गार्ड बदलायचे होते. मात्र, मोबाइल दुकाने, केअर सेंटर बंद असल्याने खोळंबा झाला होता.
निर्बंध शिथिल केल्यानंतर मोबाइलची दुकाने उघडली, केअर सेंटर सुरू झाले. मोबाइल आता जीवनावश्यक बनला आहे. त्यामुळे दुकाने, केअर सेंटरमध्ये ग्राहक माेठ्या संख्येने येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये, याकरिता तोंडाला मास्क असेल तरच येथे प्रवेश दिला जातो. गर्दी होऊ नये म्हणून काळजी घेण्यात येते आहे. मोबाइल केअर सेंटरमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला एक विशिष्ट क्रमांक दिला जातो, त्यानुसारच काउंटरवर बोलावले जाते. त्यामुळे ग्राहकांचा एकमेकांशी संपर्क कमी होतो. कर्मचाऱ्यांना फेस शिल्ड, हॅण्ड ग्लाेज दिले आहेत. सुरक्षित अंतर ठेवून बसण्याची व्यवस्था केली आहे. बाहेर हॅण्ड सॅनिटायझर ठेवले असून हात स्वच्छ करूनच आतमध्ये प्रवेश दिला जातो. असे काही वेगळे नियम घालून दिल्याने गर्दी होत नाही.
अनेक मोबाइल दुकानदारांनी ग्राहकांना घरपोहोच सेवेचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यालाही ग्राहकांचा प्रतिसाद मिळतो आहे. जवळ-जवळ सर्वच मोबाइल दुकानांचे मालक व तेथील कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली आहे. ‘मोबाइल बिघडला म्हणून काय झाले, आमच्या बरोबरच ग्राहकांचे आरोग्य नको बिघडायला,’ याची विशेष काळजी घेतली जात असल्याचे संगमनेर मोबाइल असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता हासे यांनी सांगितले.
-----------
शासनाने घालून दिलेल्या निर्बंधांमुळे दीड महिना सॅमसंग केअर सेंटर बंद होते. या काळात ग्राहकांची गैरसोय झाली. कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये याकरिता आमच्या कंपनी प्रशासनाने काही वेगळे नियम घालून दिले आहेत. त्यांचे आम्ही पालन करत आहोत. ग्राहकदेखील आम्हाला सहकार्य करत आहेत.
-सचिन पांडे, सर्व्हिस मॅनेजर, सॅमसंग केअर सेंटर, संगमनेर
-----------
मोबाइल खरेदी करणाऱ्यांसाठी घरपोहोच सेवेचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. ग्राहकांकडून याला प्रतिसाद मिळत असून विशेष काळजी घेऊन ही सेवा पुरविली जात आहे. दुकानातील सर्व कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली आहे. नियमांचे पालन केले जात आहे.
-यश मेहता, संचालक, एस. एस. मोबाइल, संगमनेर
-----------
मोबाइल पडल्याने स्क्रीन गार्ड फुटले होते. लॉकडाऊन असल्याने मोबाइलची दुकाने बंद होती. सोमवारी दुकाने उघडल्यानंतर साकूरहून संगमनेरात येत स्क्रीन गार्ड टाकून घेतले.
- धीरज तिरवाडी, रा. साकूर, ता. संगमनेर
780