लोकमत न्यूज नेटवर्कनिघोज : मुंबई उच्च न्यायालयाने बैलगाडा विधेयकाबाबतचे कामकाज पूर्ण करायला जरी १५ दिवस वेळ दिला असला तरी आगामी नवरात्र उत्सव नजरेसमोर ठेवून सरकार एक आठवड्याच्या आत सर्व कामकाज पूर्ण करेल, असे राज्याचे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी सांगीतले.आमदार महेश लांडगे व अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटनेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी पशुसंवर्धन आयुक्तालय पुणे येथे मंत्री महादेव जानकर यांची भेट घेवून नियमावली तात्काळ सादर करण्याबाबत मागणी केली. यावेळी राज्याचे पशुसंवर्धनचे प्रधान सचिव विकास देशमुख, राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त कांतीलाल उमाप, सहायक आयुक्त प्रशांत भड, अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे नितीन शेवाळे, संदीप बोदगे, नवनाथ होले, रामकृष्ण टाकळकर,अनिल लांडगे, दत्ताभाऊ लांडे, विकास नायकवडी, अमोल खोटे उपस्थित होत.े बैलगाडा शर्यतीच्या विधेयकाबाबत नियमावलीसाठी ११ ते ३१ आॅगस्ट ही सूचना हरकतीसाठी मुदत होती. प्राणीमित्रांनी शेवटच्या दिवशी ३१ आॅगस्टला हरकती सादर केल्याने व त्यानंतर सलग सुट्ट्या आल्याने याबाबतचे कामकाज अजूनही प्रगतीपथावर नाही. शुक्रवारी पशुसंवर्धनचे सचिव विकास देशमुख यांनी याबाबत पशुसंवर्धन आयुक्त कांतीलाल उमाप व सहाय्यक आयुक्त प्रशांत भड यांच्यासोबत आढावा घेणार आहेत. प्रशासकीय पातळीवर याबाबत कोणतीही दिरंगाई होणार नाही याची काळजी घेत असल्याचे पशुसंवर्धन सचिव विकास देशमुख यांनी सांगीतले, अशी माहिती पारनेर तालुक्यातील निघोज येथील अखिल भारतीय बैलगाडा चळवळीचे प्रणेते संदीप बोदगे यांनी दिली.
बैलगाडा शर्यतीबाबतचे कामकाज आठवड्यात पूर्ण करू-जानकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 16:22 IST