अहमदनगर : दोन वर्षे सरले, आता सहा महिन्यांचा कालावधी उरलेला असताना महापालिकेतील भाजप सत्ताधाऱ्यांना नेहरू मार्केटसह तीन ठिकाणी व्यापारी संकुल (शॉपिंग कॉम्प्लेक्स) उभारण्याची आठवण झाली आहे. नेहरू मार्केट, प्रोफेसर कॉलनी चौक आणि सावेडी येथील एनसीसी कार्यालयाच्या जागेवर शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याची घोषणा महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केली आहे. त्यासाठी तत्काळ प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना महापौर बाबासाहेब वाकळे यांनी नगररचना विभागाला दिल्या आहेत.
महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी महापालिकेत बैठक झाली. मनपा नगररचना विभाग, बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग, अमृत पाणी योजना ,फेज-२ पाणी योजनेचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. या बैठकीला उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे, उपमहापौरांचे पुत्र संजय ढोणे, माजी नगरसेवक निखिल वारे, नगरसेविका सोनाबाई शिंदे यांचे पुत्र सतीश शिंदे, नगररचना विभागप्रमुख राम चारठाणकर, शहर अभियंता सुरेश इथापे, पाणीपुरवठा विभागप्रमुख रोहिदास सातपुते, अभियंता, ठेकेदार उपस्थित होते.
बांधकाम परवान्यासाठी नागरिकांना तात्काळ परवानगी द्यावी. फाईलींचा प्रवास कमीत कमी दिवसांत करून मंजुरी द्यावी, प्रत्येक अधिकाऱ्यांनी आपआपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी, शहराला पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होण्यासाठी अमृत पाणी योजनेच्या पाईपलाईन टाकण्याच्या कामास गती द्यावी, अशा सूचना महापौरांनी दिल्या. अनेक अडथळे दूर झाले असून लवकरच शहराला पूर्ण दाबाने पाणी मिळणार आहे. तसेच फेज-२ पाणी योजनेचे काम प्रगतीपथावर आहे. शासनाच्या विविध योजनांची कामे शहरात सुरू असून लवकरच ही कामे मार्गी लागावी, यासाठी प्रशासनाने काम करावे. शहरामध्ये मनपा बजेट अंतर्गत विविध विकासकामे प्रभागामध्ये मंजूर आहेत. तसेच मनपा फंडातील कामे मंजूर आहेत. या कामांच्या निविदाप्रक्रियेला विलंब होत असल्याने अनेक रस्त्यांची कामे प्रलंबित आहेत. यासाठी निविदेप्रक्रियेवर अनेक अधिकाऱ्यांच्या सह्या घ्याव्या लागत आहेत. त्या कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात व बांधकाम विभागालाच मंजुरीचा अधिकार द्यावा, छाननी प्रक्रियेतही एखादा अधिकारी सुटीवर असल्यास छाननी प्रक्रियेला विलंब होत आहे. दुसऱ्या दिवशी छाननी प्रक्रिया पार पाडावी, असे आदेशही महापौरांनी दिले आहेत.
-------------
रस्त्यांची कामे अडली
गंगा उद्यानाशेजारील रस्ता हा औरंगाबाद रस्त्याला जोडणारा रस्ता आहे. या रस्त्याचे काम ९० टक्के पूर्ण झाले असून काही तांत्रिक अडचणीमुळे काम रखडले आहे. तारकपूर रोड ते विभागीय एस. टी. डेपोला जोडणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण हटवून रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे. सीना नदीलगतचा डीपी रस्ता बालिकाश्रम रोड पंपीग स्टेशन ते कल्याण रोडला जोडणारा हा नवीन रस्ता मनपा निर्माण करणार आहे. नगररचना विभागाने तात्काळ कार्यवाही सुरू करावी. जेणेकरून या रस्त्यामुळे शहर विकासाला चालना मिळणार आहे.
---
फोटो- ०३ महापालिका
महापालिकेतील विविध विभागांची महापौर बाबासाहेब वाकळे यांनी बुधवारी आढावा बैठक घेतली. यावेळी अधिकारी, माजी नगरसेवक उपस्थित होते.