ऑनलाइन लोकमत
घोडेगाव (अहमदनगर), दि. १ - येथील शनी चौकात शनिवारी सकाळी सहा वाजता आराम बसला खाद्य तेलाचा टँकर पाठीमागून धडकला. त्यात टँकरची पुढची बाजू व आराम बसच्या मागील बाजूचे नुकसान झाले असून, या अपघातादरम्यान बस क्लिनरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, तर बसमधील चार प्रवाशांच्या डोक्याला मार लागला आहे.
शनिवारी सकाळी सहा वाजता एम. बी. लींक कंपनीची आराम बस क्रमांक (एम़ एच़ ०९, सी़ व्ही़ ६१९७) घोडेगाव येथील शनी चौकात आली असता बस चालकाने अचानक ब्रेक मारून थांबवली. त्यामुळे पाठीमागून येणारा जय मल्हार ट्रांसपोर्ट कंपनीचा खाद्य तेलाचा टँकर (क्रमांक एम़ एच़ ४६, ए़ आऱ ९९९०) हा बसवर पाठीमागून धडकला. या अपघातात टँकर चालक कांकनू व्यंकटराव टिकनरे (रा. कुंदराळा ता. मुखेड जि. नांदेड) याला किरकोळ मार लागला. मात्र तो स्टेरिंगच्या मागे सरकल्यामुळे सीटमध्येच अडकला होता. त्याला ओढून बाहेर काढावे लागले.
इचलकरंजीवरुन जालन्याला जाणाºया या आराम बसमध्ये २५ प्रवासी होते. अपघातानंतर बस चालक गोकुळ तबाजी भवार (रा. नांदुर शिंगोटे, ता. सिन्नर, जि. नाशिक) हा तात्काळ तेथून फरार झाला. तर क्लीनर अमोल पांडुरंग पाटील (रा. कोल्हापूर) याला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे तो मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नेवासा ग्रामीण रुग्णालयात पाटील याच्या मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले़
बसमधील चार प्रवाशांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांना अहमदनगर येथील हॉस्पिटलमध्ये उपचारसाठी दाखल करण्यात आले़ जखमींना रिक्षा संघटनेचे अध्यक्ष मधुकर आल्हाट व इतर रिक्षा चालकांनी रुग्णालयात पोहोचविण्यासाठी मदत केली़
दरम्यान सोनई पोलीस ठाण्यात टँकर चालक काकनू व्यंकटराव टिकनरे याने फिर्याद दाखल केली आहे़ पुढील तपास सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विश्वनाथ गोल्हार हे करत आहेत.