अहमदनगर : सर्वसामान्य रुग्णांच्या उपचारासाठी पारनेर मतदारसंघाचे आ. नीलेश लंके यांनी भाळवणी येथे मोठे कोविड सेंटर उभारून ते स्वत: तेथे रुग्णसेवा करत आहेत. आ. लंके यांचा जिल्ह्यातील इतर पुढाऱ्यांनीही आदर्श घ्यावा, असे आवाहन येथील ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सुरेश लगड यांनी केले आहे.
नगर जिल्ह्यात अनेक साखर कारखानदार व शिक्षणसम्राट आहेत. त्यातील काही जण वगळता बाकीच्यांनी प्रशासनाने आवाहन केल्यानंतरही कोविड सेंटर उभारण्यात योगदान दिल्याचे दिसत नाही. दुसरीकडे आ. लंके यांच्याकडे साखर कारखाना अथवा शिक्षण संस्था असे काहीच नाही. तरीदेखील त्यांनी कोरोना महामारीची तीव्रता लक्षात घेत जनसेवेसाठी कोविड सेंटर उभारले आहे. लंके यांच्या या कार्याचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. जिल्ह्यातील इतर पुढाऱ्यांनीही सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी असे योगदान द्यावे, अशी अपेक्षा ॲड. लगड यांनी व्यक्त केली आहे.