टाकळी ढोकेश्वर :
पारनेर तालुक्याची तहान भागविणाऱ्या मांडओहळ धरणाच्या लाभक्षेत्रावर सध्या चिंतेचे ढग आहेत. मांडओहळ धरणाचे लाभक्षेेत्र असलेल्या सावरगाव, नांदूरपठार, काळेवाडी, पळसपूर, काताळवेढे या परिसरात यंदा अत्यंत कमी पाऊस आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक झाली नसून अवघा १९ टक्के पाणीसाठा आहे. पाऊस हंगाम अखेरच्या टप्प्यात असून धरण ओव्हरफ्लो होते की नाही याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
टाकळी ढोकेश्वर, कर्जुले हर्या, कातळवेडे व पठारावरील १६ गावांची कान्हूर पठार या गावांना पाणपुरवठा होत असलेली पाणी योजना मांडओहळ धरणातून आहे. धरणात सध्या अत्यल्प पाणीसाठा आहे. त्यामुळे तालुक्यातील ७३ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट बनण्याची शक्यता आहे. पावसाचे पहिले तीन महिने तर कोरडेच गेले. आता परतीचा पाऊस चांगल्या प्रमाणात झाला तरच तालुक्याचा पाण्याचा प्रश्न मिटेल, अन्यथा २०१९ प्रमाणेच टँकरने पाणीपुरवठा करावा लागण्याची शक्यता आहे. मांडओहळ धरणाच्या मध्यम प्रकल्पाची साठवण क्षमता ३९९ दशलक्ष घनफूट आहे. त्यामध्ये उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता ३१० दशलक्ष घनफूट आहे. सध्या धरणात ६० दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे.
२०२० मध्ये जून, जुलै व ऑगस्टमध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे धरण ओहरफ्लो झाले होते. यंदा मात्र पावसाने दडी मारल्यामुळे धरणाची पाणी पातळी १९ टक्केच आहे.
-----
यंदा पर्यटकांचीही पाठ..
मांडओहळ धरणाच्या पाणलोटात पाऊस झाल्यानंतर रूईचोंडा धबधबा कोसळू लागल्यावर येथे मोठ्या संख्येने पर्यटक येतात. याशिवाय या भागातील इतरही लहान-मोठे धबधबेही पर्यटकांना आकर्षित करतात. त्यामुळे येथे नगर जिल्ह्यासह पुणे, मुंबई येथूनही पर्यटक येतात. यंदा मात्र पाऊस नसल्याने पर्यटकांनीही पाठ फिरविली आहे.
----
१३ मांडओहळ
पारनेर तालुक्यातील महत्त्वाच्या मांडओहळ धरणातील अत्यल्प पाणीसाठा.