अहमदनगर : नगर तालुक्यातील जखणगाव येथे सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलेच्या हनीट्रॅपमध्ये नगर शहरात नोकरी करणारा एक क्लासवन अधिकारीही अडकल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात मंगळवारी सदर महिलेसह तिच्या चार साथीदारांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी पीडित अधिकाऱ्यानेच फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी महिलेसह तिचे साथीदार सचिन भीमराज खेसे (रा. हमीदपूर, ता. नगर), अमोल सुरेश मोरे (रा. कायनेटिक चौक, नगर), महेश बागले व सागर खरमाळे (दोघे, रा. नगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत खेसे याला अटक केली. आरोपी महिला व अमोल मोरे यांना पोलिसांनी आधीच दाखल झालेल्या गुन्ह्यात १५ मे रोजी अटक केलेली आहे.
आरोपी महिलेने सदर अधिकाऱ्यास १ मे रोजी दुपारी तिच्या जखणगाव येथील बंगल्यात बोलावून घेतले. यावेळी अधिकाऱ्यास शरीरसंबंध करण्यास भाग पाडून तिच्या साथीदारांनी त्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले. व्हिडिओ पूर्ण होताच सदर महिला व तिच्या साथीदारांनी या अधिकाऱ्यास ‘तीन कोटी रुपये आणून दे, नाहीतर हा व्हिडिओ पोलिसांना दाखवून तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन’, अशी धमकी दिली. यावेळी अधिकाऱ्याच्या वाहनात असलेले ३० हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले, तसेच त्यानंतर अधिकाऱ्याकडून ऑनलाइन ५० हजार रुपये आरोपींनी त्यांच्या नातेवाइकांच्या खात्यावर मागवून घेतले. त्यानंतरही ही महिला या अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करून वारंवार तीन कोटी रुपये देण्याची मागणी करत होती. दरम्यान, अशाच पद्धतीने केलेल्या ब्लॅकमेलिंग प्रकरणात ही महिला आणि तिचा साथीदार अमोल मोरे यांच्याविरोधात १५ मे रोजी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर या अधिकाऱ्यानेही पोलिसांशी संपर्क करत त्याच्याबाबत घडलेली घटना सांगितली.
............
पोलिसाच्या भावाचाही हनीट्रॅपमध्ये सहभाग
क्लासवन अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल होताच तपास अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या पथकाने हमीदपूर येथून सचिन खेसे याला अटक केली आहे, तसेच या गुन्ह्यातील फरार आरोपी खरमाळे व बागले यांचा शोध सुरू असून, खरमाळे हा एका पोलीस कर्मचाऱ्याचा भाऊ आहे.
.........
या दोघांनंतर आणखीन कोण?
जखणगावच्या ३० वर्षीय महिलेच्या गुलाबी आमिषात अडकून एक श्रीमंत व्यावसायिक फसल्याचे समोर आल्यानंतर क्लासवन अधिकाऱ्याचे प्रकरणही समोर आले आहे. दरम्यान, ही महिला व तिच्या साथीदारांनी नगर तालुक्यातील आणखी काही श्रीमंतांना नाजूक संबंधात अडकवून ब्लॅकमेल केल्याची चर्चा आहे. अशा पद्धतीने फसवणूक झालेल्या लोकांनी पुढे यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
.........
मैत्री, प्रेम आणि ट्रॅप
जखणगाव येथील बंगल्यात एकटीच राहणारी आरोपी महिला ही आधी श्रीमंत व्यक्तींशी मैत्री करायची. त्यानंतर त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून शरीरसुखाचे आमिष दाखवायची. समोरचा व्यक्ती महिलेच्या आमिषाला भाळला की, या टोळीचे पुढील नियोजन ठरलेले असायचे. टार्गेट केलेल्या व्यक्तीला घरी बोलावून त्याला शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडायचे. याच वेळी घरात लपलेले तिचे साथीदार मोबाइलमध्ये चित्रीकरण करायचे. त्यानंतर ब्लॅकमेलिंग. असा हा प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होता.
............
तिच्या मोबाइलमध्ये मिळाले ‘ते’ व्हिडिओ
श्रीमंतांना ब्लॅकमेल करण्यासाठी आरोपी महिला व तिच्या साथीदारांनी तयार केलेले व्हिडिओ पोलिसांना आरोपींच्या मोबाइलमधून मिळाले आहेत. हनीट्रॅप प्रकरणात आणखी तक्रारदार वाढून आरोपी वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.