संगमनेर/ तळेगाव दिघे : शेतात महिलेचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना देणाऱ्या व्यक्तीनेच या महिलेचा खून केल्याचे अहमदनगरच्या गुन्हे श्वान पथकातील रक्षा या श्वानामुळे समोर आले आहे. सोमवारी (दि. २२) संगमनेर तालुक्यातील मल्हारवाडीत वाट्याने शेती करणाऱ्या अकोले तालुक्यातील आदिवासी महिलेचा खून झाला होता. तालुका पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत आरोपीला अटक केली.
मंगल वामन पथवे (वय ४५, रा.उंचखडक, ता.अकोले), असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. राजू शंकर कातोरे असे खून करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. संगमनेर तालुक्यातील कऱ्हे शिवारात रामदास म्हातारबा सानप यांची शेती आहे. मंगल पथवे व राजू कातोरे हे दोघे वाट्याने शेती करीत होते. सोमवारी दुपारी एकच्या सुमारास कऱ्हे शिवारात चारी क्रमांक चारजवळ भाऊपाटील शंकर सानप यांच्या शेतात एका महिलेचे प्रेत पडले असल्याची माहिती संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांना समजली. ते घटनास्थळी पोहोचल्यानंतर अहमदनगर येथून श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले.
सहायक फौजदार विजय खंडीझोड, इस्माइल शेख, पोलीस हेड कॉस्टेबल अशोक पारधी, महिला पोलीस नाईक ज्योती दहातोंडे, पोलीस नाईक अनिल जाधव, बाबा खेडकर, राजेंद्र घोलप, चालक पोलीस नाईक ओंकार शेंगाळ, महिला पोलीस कॉन्स्टेबल वंदना वाकचौरे आदींनी या गुन्ह्याचा तपासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
...
आरोपीकडून खुनाची कबुली
शेतात महिलेचे प्रेत असल्याची माहिती मृत महिलेसोबत वाट्याने शेती करणाऱ्या कातोरे याने पोलिसांना दिली होती. पोलिसांना त्याच्यावर संशय असताना ‘रक्षा’ या श्वानाने देखील कातोरे याचा माग घेतला. पोलिसांनी चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतले असता किरकोळ कारणावरून मंगल पथवे यांचा त्याने खून केल्याचे तपासात समोर आले. कातोरे याला सोमवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. वाट्याने सोबत शेती करणाऱ्या महिलेच्या खुनाची कबुली आरोपी कातोरे याने दिली आहे, असे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी सांगितले.
...