शेवगाव : मंगळवारी (दि.१) सायंकाळच्या सुमारास झालेल्या यंदाच्या पहिल्याच पावसात बहुतांशी रस्त्यांवर, उपनगरातील खुल्या जागेवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शेवगाव शहर जलमय झाले. उपनगरातील अनेक भागांत पाणी साचल्याने रहदारीचे रस्ते पाण्याखाली गेले. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाविषयी संताप व्यक्त केला आहे.
पूर्वमोसमी पावसानेच अशी दाणादाण उडाली. मान्सून सुरू झाल्यानंतर काय अवस्था होणार असा सवाल विचारला जात आहे. नगरपरिषद प्रशासनाने पावसाळ्यापूर्वीच्या उपाययोजना आखण्याचे काम सोमवारी (दि.३१) हाती घेतले आहे. या कामांना उशीर का केला? असा सवालही नागरिक प्रशासनाला विचारू लागले आहेत.
तालुक्यातील महसूल मंडलनिहाय शेवगाव ६४ मिलीमीटर, भातकुडगाव ४७, बोधेगाव २९, चापडगाव ३३, एरंडगाव ३२, तर ढोरजळगाव २० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस शेवगाव महसूल मंडळात झाला आहे. मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास पावसाला सुरवात झाली. दोन तास सुरू असलेल्या पावसाने उपनगरामधील रस्ते पाण्याखाली गेले होते. सांडपाण्याचे नियोजन, गटारींचा अभाव, पाणी जाण्यास जागा नसल्याने पाण्याचा निचरा होत नाही. आदी कारणांमुळे उपनगरात पाणी साचत आहे. यावर उपाययोजना आखण्यात प्रशासनाला दरवर्षी अपयश येत आहे. पाणी साचल्याने रोगराईला निमंत्रण मिळत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
शहरातील प्रभाग क्रमांक आठमधील एका नागरिकाच्या घरात रस्त्यावरील पाणी घुसल्याची घटना घडली आहे. याला प्रभारी मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांनी दुजोरा दिला असून त्याठिकाणी गटारीचे अर्धवट बांधकाम झाल्याने हा प्रकार घडल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, वरूर रस्त्यावरील प्रभाकर नगर, गुरुदत्त हौसिंग सोसायटी, महसूल कॉलनी, म्हसोबा नगर, हनुमान नगर, जुना प्रेस, ब्राम्हण गल्ली, कुंभार गल्ली आदी भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. काही भागात रस्ते पाण्याखाली गेल्याने रहदारीचे मार्ग बंद झाल्याने पाण्यातून वाट शोधावी लागत आहे.
......
पूर्णवेळ अधिकारी हवा..
‘लोकमत’ने २७ मे रोजीच्या अंकात ‘पावसाळ्यापूर्वीच्या उपाययोजनांचा नगरपरिषदेला विसर’ या आशयाची बातमी प्रसिद्ध झाल्यावर प्रशासन खडबडून जागे झाले. त्यानंतर धोकादायक इमारतींना नोटीसा, उपाययोजना आखताना नाले, ओढे, गटार सफाईची कामे प्रशासनाने हाती घेतली. सध्या नगरपरिषदेवर प्रशासकाची नियुक्ती आहे. नेवाशाचे मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांच्याकडे शेवगाव नगरपरिषदेचा पदभार देण्यात आलेला आहे. पूर्णवेळ अधिकारी नसल्याने दैनंदिन कामे खोळंबली आहेत.
------
०२ शेवगाव पाऊस
मंगळवारी सायंकाळी झालेल्या पहिल्याच पावसात उपनगरातील रस्ते जलमय झाले होते. (छायाचित्र : रामनाथ रुईकर)
020621\img-20210602-wa0028.jpg
मंगळवारी शेवगाव येथे झालेल्या पावसाने रस्ते जलमय झाले होते, त्याचे वरूररोडवरील बोलके छायाचित्र रामनाथ रुईकर यांनी टिपले आहे.