अहमदनगर: शहर बससेवा सुरू करण्याचा करार महापालिकेने यशवंत अॅटो सर्व्हिस संस्थेसोबत केला. मात्र संस्थेला बस अजूनपर्यंत मिळालेल्या नाहीत. बसेस नसल्याने महापालिकेने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे परवाना मिळण्यासाठी अर्ज केलेला नाही. त्यामुळे शहर बससेवा सुरू कधी होणार याची प्रतीक्षा नगरकरांना लागून आहे. महापालिकेने अभिकर्ता संस्थेशी करारनामा केला असून संस्थेला कार्यारंभ आदेशही देण्यात आला आहे. बसेस उपलब्ध होण्यास विलंब लागत असल्याने सेवा सुरू होण्यास उशीर होत आहे. आचारसंहिता लागू होवो अथवा न लागो बससेवा सुरू होणारच आहे. बस सुरू करण्याचे श्रेय घेण्यासाठी आमची धडपड नाही. जनतेला सेवा मिळाली पाहिजे अशी आमची भूमिका असल्याची प्रतिक्रिया महापौर संग्राम जगताप यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. संस्थेने बसेस आणल्यानंतर त्या नोंदणीसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे जातील. त्यानंतर महापालिका उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे परमीटसाठी अर्ज करेल. अर्ज आल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बसेसची तपासणी करून त्यांना परमीट देईल. त्यानंतर बससेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होईल. ही प्रक्रिया होण्यास किमान आठवडाभराचा कालावधी लागणार आहे. त्यामुळेच बससेवा सुरू होण्याची प्रतीक्षा नगरकरांना लागून आहे.
नगरकरांना शहर बसची प्रतीक्षा
By admin | Updated: August 23, 2014 00:44 IST