अहमदनगर : साध्या प्लाझ्माचा तुटवडा दूर करण्यासाठी जनकल्याण रक्तपेढी मोठे कार्य करत आहे. यासाठी शांतीकुमारजी मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने जनकल्याण रक्तपेढीला अत्याधुनिक अफेरेसीस मशीन दिले आहे. या मशीनच्या माध्यमातून आता प्लाझ्मा संकलन अधिक वेगाने होईल. त्याचा फायदा जिल्ह्यातील जास्तीत जास्त रुग्णांना होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन शांतीकुमार मेमोरियल फाउंडेशनचे संचालक उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी केले.
शांतीकुमारजी मेमोरियल फाउंडेशन व आय लव्ह नगरच्या वतीने जनकल्याण रक्तपेढीला रक्तातील प्लाझ्मा संकलन करण्यासाठी अत्याधुनिक अफेरेसीस मशीन भेट देण्यात आले. या मशीनचे शनिवारी लोकार्पण झाले. यावेळी उद्योजक नरेंद्र फिरोदिया, आ. संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, उद्योजक विक्रम फिरोदिया, जनकल्याण रक्तपेढीचे अध्यक्ष राजेश झंवर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, जनकल्याण समितीचे राज्याचे प्रमुख डॉ. रवींद्र साताळकर, संघाचे शहर कार्यवाह हिराकांत रामदासी, रक्तपेढीचे संचालक डॉ. पंकज शहा, डॉ. दिलीप धनेश्वर, प्रवीण बजाज, प्रमोद सोनटक्के, राजेश परदेशी, अनिल धोकारीया, सुरेश रुणवाल आदी उपस्थित होते.
यावेळी आ. संग्राम जगताप म्हणाले, जनकल्याण रक्तपेढीने मागणी केल्यावर क्षणाचाही विचार न करता नरेंद्र फिरोदिया यांनी अफेरेसीस मशीनसाठी मदत केली आहे. या मशीनमुळे प्लाझ्माचा तुटवडा कमी होणार आहे. गेल्या वर्षापासून गरजूंना सर्वप्रकारची मदत करताना नगरमधील शांतीकुमार मेमोरियल फाउंडेशन सारख्या विविध सामाजिक संघटना पुढे येऊन केलेल्या मदत कार्यामुळे हे संकट लवकरात लवकर दूर होईल.
महापौर वाकळे म्हणाले, कोरोना बाधित अत्यवस्थ रुग्णांना प्लाझ्मा दिल्याने ते बरे होत आहेत. याची गरज ओळखून शांतीकुमार मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने जनकल्याण रक्तपेढीला मिळालेल्या अत्याधुनिक अफेरेसीस मशीनमुळे आता कित्येक नागरिकांचे प्राण वाचणार आहेत.
राजेश झंवर म्हणाले, नरेंद्र फिरोदिया यांनी मी केलेल्या केवळ एका मेसेजवर नवे अफेरेसीस मशीन उपलब्ध झाले आहे. या संकटकाळात सतत मदतीला धावून जाणारे नरेंद्र फिरोदिया हे मानव कल्याणचे कार्य करत आहेत.
डॉ. विलास मढीकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार मानले. यावेळी जनकल्याण रक्तपेढीचे व्यवस्थापक मुकेश साठे, सुशांत पारनेरकर, सोनाली खंदारे, सागर उंडे आदी उपस्थित होते.
------------------------------------
फोटो - १५ जनकल्याण ब्लड बॉंक
जनकल्याण रक्तपेढीत शांतीकुमारजी मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने देण्यात आलेल्या अत्याधुनिक अफेरेसीस मशीनचे लोकार्पण प्रसंगी उद्याेजक नरेंद्र फिरोदिया, आ. संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, विक्रम फिरोदिया, राजेश झंवर, संघाचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, डॉ. रवींद्र साताळकर आदी.