तीसगाव : चितळी (ता. पाथर्डी) येथील कृषी पदवीधर युवकाने पॉली हाऊसमध्ये पिकविलेली रंगीबेरंगी ढोबळी मिरची युरोप, दुबईतील बर्गर, पिझ्झाची चव वाढवीत आहे. येथील मिरचीला विदेशात चांगली मागणी वाढली आहे. प्रतवारीनुसार ५० ते २०० रुपये प्रति किलोचा भाव या मिरचीला मिळत आहे. या माध्यमातून पन्नास गुंठ्यांत लाखो रुपये कमविल्याचे त्याने सांगितले.
हर्षवर्धन बाळासाहेब ताठे असे त्या कृषी पदवीधर युवकाचे नाव आहे. त्याने कृषी पदवी घेतल्यानंतर पारंपरिक शेतीला फाटा दिला. पुरेसे पाणी, आधुनिक तंत्रज्ञानाची कास, हंगामानुसार प्रतवारीचे नियोजन केले. पन्नास गुंठे क्षेत्रात पॉली हाऊसची उभारणी केली. ऑक्टोबर २०२० अखेरीस सिमला वाण मिरचीची बेडवर लावणी केली. नव्वद दिवसांत दहा फूट उंचीपर्यंत रोपांची वाढ होऊन हिरवी, पिवळी, लाल अशा तीन रंगांच्या जोमदार मिरच्या सुरू झाल्या. आठ महिन्यांत पन्नास टन मिरचीचे उत्पादन हाती आले. अकरा लाखांचा खर्च वगळता पदरी तेहतीस लाख रुपये पडले. अजूनही दोन महिने मिरची उत्पादन सुरूच राहणार आहे. त्यांच्या मिरचीला युरोप, दुबईतून मागणी आहे. त्यांनी मिरचीची निर्यातही केली आहे. यातून त्यांना प्रतवारीनुसार प्रति किलो ५० ते २०० रुपयांचा भावही मिळाला आहे.
बारामती कृषी महाविद्यालयातील ऐश्वर्या ताठे हिने या मिरच्या उत्पादन प्रकल्पाचा बुधवारी आढावा घेतला. त्यावेळी प्रारंभीची प्रतवारी, विदेशातूनची वाढती मागणी, मजुरांचा खर्च, रोपांची बांधणी, शेण खताने बेड भरणी, पन्नास ते दोनशे रुपयांपर्यंतचे दर, पॉली हाऊसचा हायटेक खर्च होऊनही नफ्याचे संतुलन, आदींबाबत माहिती घेतली.
---
सुरत, मुंबईतही चांगला दर
अवकाळी पावसाने प्रतवारी सध्या घटत आहे. त्यामुळे सध्या सुरत, मुंबई, पुणे, नाशिक येथेही चांगला दर मिळत आहे, असे ताठे याने सांगितले.
---
२३ चितळी मिरची
चितळी येथील पॉली हाऊसमध्ये पिकविलेली मिरची दाखविताना हर्षवर्धन ताठे.