अहमदनगर : मुलांना कडेवर घेवून भर उन्हात भीक मागणाऱ्या महिला आता चौकाचौकात पहायला मिळत आहेत. भिकेसाठी मुलांचा वापर करण्याची फॅनशनच आली आहे. या मुलांना भर उन्हात अक्षरश: कडेवर डांबून ठेवत या महिला ट्रॅफिक सिग्नलवर उभ्या असतात. मात्र, सर्व शासकीय यंत्रणा या बाल शोषणाबाबत डोळेझाक करत आहेत. मृत मुलाला कुशीत घेवून एक महिला भीक मागत असल्याचा प्रकार औरंगाबादमध्ये उघडकीस आला. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आली होती. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने नगर शहरात पाहणी केली असता येथेही अशा महिलांचे पीक आले आहे. अनेक ट्रॅफिक सिग्नलवर लहान मुलांना कडेवर घेवून महिला भीक मागताना दिसतात. सध्या उन्हाचा पारा ४१ अंशावर गेला आहे. या उन्हात मोठ्या माणसाचीही दमछाक होते. परंतु ही लेकरे सक्तीने रस्त्यावर आहेत. उन्हाच्या झळा व प्रदूषण या दोन्ही बाबी त्यांना झेलाव्या लागतात. या अबोल जिवांना आपली ही वेदना कुणाला सांगताही येत नाही. खेळण्या-बागडण्याच्या दिवसांमध्ये त्यांच्या नशिबात हा ट्रॅफिक सिग्नल आला आहे. पाच-सात वर्षांची काही लहान मुलेही एकेकटीच भीक मागताना दिसतात. दोन-दोन तास चौकात थांबून दिसेल त्या वाहनाला ती आडवी होतात. प्रेमदान चौक, डीएसपी चौक, पत्रकार चौकात हे प्रमाण जास्त आहे. विशेषत: गुरुवारी आणि शनिवारी मंदिर तसेच सार्वजनिक ठिकाणी ही संख्या जास्त असते. मुलांना बघून अनेकजण भीक टाकतात. (प्रतिनिधी)महिला बालकल्याण विभाग काय करतो?लहान मुलांचे शोषण थांबविणे ही महिला बालकल्याण विभागाची जबाबदारी आहे. यासाठी कायदे व विविध योजनाही आहेत. मात्र हा विभाग या लहान मुलांकडे बघायला तयार नाही. ही मुले आली कोठून? ती चोरीची आहेत का? याबाबतही काहीच शहानिशा पोलीस तसेच महिला बालकल्याण विभागाकडून होत नाही.
भिकेसाठी लहान मुलांची होरपळ
By admin | Updated: April 23, 2016 01:07 IST