अहमदनगर : ज्या चिऊताईबद्दल बालगीते व बालकथांमधून भरभरुन ऐकवले जाते, ती चिऊताई म्हणजेच चिमणी, ऐतिहासिक नगर शहरातून आता गायब झाली आहे. आज झालेल्या पक्षी निरीक्षणात एकाही चिमणीची नोंद झाली नसून इतर २२ जातींच्या १५१ पक्ष्यांची नोंद झालेली असताना चिऊताई मात्र शहरातून हरवली आहे. कधीकाळी चिमण्यांच्या चिवचिवाटाने माणसांना जाग येत. आता तीच गायब होत आहे.नगरमधील पक्षीतज्ज्ञ डॉ. सुधाकर कुऱ्हाडे यांनी काही पक्षी मित्रांसमवेत निसर्ग मित्र मंडळाची स्थापना केली आहे. या मंडळाच्यावतीने कापूरवाडी तलाव किंवा पिंपळगाव माळवी तलाव या परिसरात दरवर्षी पक्षीगणना करण्यात येते. यात विविध पक्षी तज्ज्ञ व अभ्यासक हजेरी लावतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी होत गेल्याने या मंडळाच्यावतीने गेल्या चार वर्षांपासून भुईकोट किल्ला परिसरात पक्षीगणना व त्यांची नोंद घेतली जाते. डॉ. सुधाकर कुऱ्हाडे यांच्यासह पक्षी अभ्यासक बाळासाहेब कुलकर्णी, विजय देवचक्के, प्रा. अविनाश अडसुरे यांनी आज सकाळी ८ ते १० या वेळेत संपूर्ण किल्ला परिसरात पक्षीगणना केली. यात २२ जातींच्या पक्ष्यांची नोंद करण्यात आली. १५१ पक्षी किल्ला परिसरात आढळून आले. चिमणी मात्र दिसली नाही. किल्ला परिसरात इतर ठिकाणी अभावाने आढळून येणाऱ्या पक्ष्यांचे अस्तित्व असताना चिमणी मात्र गायब झाल्याचे दिसून आले.आज झालेल्या पक्षी निरीक्षणात राखीपीट, सुबग, तितर यांचीही नोंद प्रथमच किल्ला परिसरात घेण्यात आली. याचबरोबर खंड्या, कोकीळ, वेडा राघु, टिटवी, लहान बगळे, कोतवाल, किडक, बुलबुल, मैना, बारवे, घार, होले, पोपट यांसारख्या आकर्षक व रंगीबेरंगी पक्ष्यांची किल्ला परिसरात नोंद घेण्यात आली. पक्षीगणनेचे हे चौथे वर्ष होते.(प्रतिनिधी)आम्ही सलग चार वर्षांपासून किल्ला परिसरात पक्षीगणना करतो. पण एकदाही चिमणी आम्हास दिसली नाही. यामुळे सर्वत्र दिसणारी चिमणी शहरातून दिसेनाशी झाल्याने चिंतेचा विषय आहे.-डॉ. सुधाकर कुऱ्हाडे, पक्षी अभ्यासक.
नगरमधून ‘चिऊताई’ गायब!
By admin | Updated: January 31, 2016 23:31 IST