राजूर : अकोले तालुक्यातील जामगाव येथे सुरू असलेल्या खडी क्रशर व कृत्रिम वाळूच्या प्लांटमधील रसायनमिश्रित पाणी शेतकऱ्यांच्या शेतात आल्याने खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. हे रसायनमिश्रित पाणी संबंधिताने तत्काळ बंद करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामपंचायत व महसूल विभागाकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
जामगावच्या दक्षिणेला बाळासाहेब आरोटे यांचा खडी क्रशर प्लांट आहे. याच ठिकाणी ते कृत्रिम वाळू तयार करत आहे. ही वाळू तयार करताना त्यासाठी वापरले जाणारे रसायनमिश्रित पाणी या प्लांटच्या दोन्ही बाजूंना सोडण्यात येत आहे. हे पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतजमिनीत येत आहे. या पाण्याबरोबर वाहून येत असलेल्या खराब मातीचा मोठा थर जमिनीत साठला असल्याचे दिसून येत आहे. या शेतकऱ्यांनी जमिनीत घेतलेल्या पिकांचे यामुळे नुकसान झाले आहे. याबाबत नंदकिशोर आरोटे व इतरांनी ग्रामपंचायत व महसूल विभागास लेखी पत्र देत नुकसानभरपाई मिळावी व हे पाणी कायमस्वरूपी बंद करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
आरोटे यांच्या तक्रारीनुसार ग्रामपंचायतीने बाळासाहेब आरोटे यांना यासंदर्भात लेखी पत्र काढले. सोमवारी ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, काही ग्रामस्थ यांनी नंदकिशोर आरोटे यांच्यासमवेत शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा केला. दगडखाणीतील दगड काढण्यासाठी होत असलेल्या जिलेटिनच्या स्फोटाने घरांना तडे गेल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले.
...............
नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन
ग्रामपंचायत बैठकीवेळी बाळासाहेब आरोटे यांना बोलविण्यासाठी ग्रामपंचायतीमधून फोन केला असता ते बाहेरगावी असल्याचे त्यांनी सांगितले. आपण संबंधित शेतकऱ्यांची नुकसानभरपाई देऊ व शेतजमिनीत येत असलेल्या पाण्याचा बंदोबस्त करू, असे आश्वासन दूरध्वनीवरून आरोटे यांनी ग्रामपंचायतीला दिल्याचे सांगण्यात आले.