नगर तालुक्यातील जखणगाव येथील ३० वर्षीय महिलेसह अमोल सुरेश मोरे (रा. कायनेटिक चौक, नगर) व बापू बन्सी सोनवणे (रा. हिंगणगाव, ता. नगर) या तिघांविरोधात ८२ पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. शरीरसुखाचे आमिष दाखवून खंडणी मागणे, मारहाण, जबरी चोरी या कलमांतर्गत आरोपींविरोधात दोष ठेवण्यात आला असल्याचे या गुन्ह्याचे तपासी अधिकारी तथा नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक राजेंद्र सानप यांनी सांगितले.
या गुन्ह्यातील मुख्य आरोपी असलेल्या महिलेने तिच्या साथीदारांशी संगनमत करून नगर तालुक्यातील एका श्रीमंत व्यावसायिकाला २६ एप्रिल रोजी तिच्या जखणगाव येथील बंगल्यात बोलविले. तेथे त्याला शरीरसंबंध करण्यास भाग पाडले. यावेळी महिलेच्या साथीदारांनी अश्लील व्हिडिओ चित्रीकरण केले. त्यानंतर या व्यावसायिकास आरोपींनी मारहाण करीत त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन, सोन्याच्या चार अंगठ्या, ८४ हजार ३०० रुपये रोख असा एकूण ५ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल हिसकावून घेतला. तसेच त्याला एक कोटी रुपयांची खंडणी मागितली. पैसे दिले नाही तर हे व्हिडिओ पोलिसांना दाखवून तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करणार, अशी धमकी दिली. या घटनेनंतर व्यावसायिकाने नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर १५ मे रोजी सहायक निरीक्षक सानप यांच्या पथकाने महिलेसह तिचा साथीदार अमोल मोरे यांना अटक केली. तपासात या गुन्ह्यात बापू सोनवणे याचाही सहभाग आढळून आल्याने पोलिसांनी त्यालाही अटक केली.
-------
महिनाभराच्या आत तपास करून दोषारोपपत्र
या गुन्ह्याचे तपासी अधिकारी राजेंद्र सानप यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्काळ आरोपींना अटक करीत तपास केला. आरोपींनी फिर्यादीचा लुटलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या गुन्ह्यात पोलिसांनी नऊ साक्षीदारांचे जबाब नोंदविले आहेत. आरोपींचे जप्त केलेले मोबाईल डिलिट डाटा रिकव्हर करण्यासाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले आहेत. यानंतर उपलब्ध होणारे पुरावेही न्यायालयात सादर करणार असल्याचे सानप यांनी सांगितले.
-----------------
पीडित क्लास वन अधिकारीही आला समोर
व्यावसायिकाला हनी ट्रॅपमध्ये अडकविल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर महिलेच्या जाळ्यात सापडलेला नगर शहरातील एक क्लास वन अधिकारीही समोर आला. त्याने तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करीत आपबिती सांगितली. त्याचेही अश्लील व्हिडिओ तयार करून या टोळीने त्याला तब्बल तीन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. या गुन्ह्यात पोलिसांनी महिलेच्या तीन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करीत दोघांना अटक केली आहे.
-----
जिल्हाभर गाजले प्रकरण
हनी ट्रॅपमध्ये एक व्यावसायिक आणि क्लास वन अधिकारी अडकल्याने हे प्रकरण जिल्हाभर गाजले. या टोळीने अनेकांना अशा पद्धतीने खंडणी मागितल्याची चर्चा होती. मात्र, बदनामीच्या भीतीने कुणी पुढे आले नाही.