मिलिंदकुमार साळवे, श्रीरामपूरकर्नाटकमधून थेट महाराष्ट्रात राहुरीच्या नगरी मातीत आलेले महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा अमराठी असल्याने त्यांनी मायमराठीतून बळीराजाशी बोलता यावे यासाठी निसंकोचपणे मराठीची शिकवणी लावली आहे.मूळ कर्नाटकातील असलेले डॉ. विश्वनाथा यांची राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी ३० डिसेंबर २०१५ रोजी नियुक्ती झाली. त्यापूर्वीचे कुलगुरू डॉ. तुकाराम मोरे महाराष्ट्रातीलच असल्याने त्यांची मातृभाषाच मराठी होती. पण आता थेट कर्नाटकातील विश्वनाथा मराठी प्रांतातील नावाजलेल्या कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू पदाच्या खुर्चीवर विराजमान झाले आहेत. येथे येण्यापूर्वी ते बंगळुरू येथील कृषी विज्ञान विद्यापीठात संशोधन संचालक पदावर कार्यरत होते. याच विद्यापीठात त्यांचे एम. एस्सी. (कृषी) व पीएच. डी. पर्यंतचे शिक्षण झालेले आहे. याशिवाय त्यांनी तामीळनाडूच्या अन्नमलाई विद्यापीठातून ‘बौद्धिक मालमत्ता’ विषयातदेखील पीएच. डी. मिळविलेली आहे. बंगळुरूच्या कानडीतून ते थेट मराठी मुलखात दाखल झाल्याने त्यांचा आतापर्यंत माय मराठीशी संबंध नव्हता. पण विद्यापीठाची सूत्रे स्वीकारल्यानंतर कृषी विद्यापीठात येणाऱ्या मराठी मुलखातील शेतकऱ्यांशी सहजगत्या संवाद साधणे शक्य व्हावे, यासाठी मराठी भाषा शिकण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार दररोज ते तास-दोन तास मराठी भाषा शिकण्यासाठी खर्च करीत आहेत. कृषी विद्यापीठातील शेतीवाडीचे ज्ञान-तंत्रज्ञान सामान्य शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच त्या शेतकऱ्याच्या आशा, अपेक्षा, मागण्या, सूचना, तक्रारींची दखल घेता यावी, यासाठी कुलगुरू डॉ. विश्वनाथा यांनी मराठीची शिकवणी लावली आहे. सध्या ते इंग्रजी व हिंदी अशा संमिश्र भाषेतून विद्यापीठ व विद्यापीठाबाहेरील कार्यक्रमांमध्ये संवाद साधताना दिसत आहेत. मंगळवारी श्रीरामपूरच्या प्रभात दूध प्रकल्पातील जागतिक दुग्ध दिन सोहळ्यातसुद्धा त्यांनी इंग्रजी व हिंदी अशा संमिश्र भाषांमधून संवाद साधत शेतकऱ्यांना गाई-म्हशीच्या शेणाचे महत्त्व समजावून सांगितले. कृषी विद्यापीठातील संशोधन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत नेण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
कुलगुरूंनी लावली मराठीची शिकवणी
By admin | Updated: June 3, 2016 23:23 IST