कोरोनाची स्थिती हळूहळू कमी झाल्यानंतर राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नगर जिल्ह्यातही शाळा सुरू झाल्या. मात्र, प्रारंभी त्याला कमी प्रतिसाद होता. नगर जिल्ह्यात नववी ते बारावीच्या एकूण १२०९ शाळा असून, त्यात २ लाख ८४ हजार ३५४ विद्यार्थी आहेत. यापैकी पहिल्या आठवड्यात २७८ शाळा सुरू होऊन, ५,५६० विद्यार्थ्यांची उपस्थिती राहिली.
आता चालू आठवड्याच्या आकडेवारीनुसार दोन महिन्यानंतर ११०० शाळा सुरू झाल्या असून, त्यात ९१ हजार २४८ विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे.
शाळा सुरू होण्याची संख्या वाढली असली तरी त्याप्रमाणात विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढलेली नाही. ही उपस्थिती अवघी ३२ टक्के आहे.
एकीकडे दहावी-बारावीच्या परीक्षा एप्रिल-मेमध्ये होण्याची शक्यता शिक्षण विभागाने व्यक्त केली असताना हा अभ्यासक्रम पूर्ण कसा करायचा, असा प्रश्न शिक्षकांसमोर आहे. काही विद्यार्थी ॲानलाईन, तर काही ॲाफलाईन अशा गोंधळामुळे अभ्यासक्रमावर परिणाम होत असून विद्यार्थ्यांचेही नुकसान होत आहे. सध्या शाळेत येत असलेल्या विद्यार्थ्यांची ॲानलाईन शिक्षणातून हवी तशी प्रगती झाली नसल्याचे लक्षात आल्यानंतर, आता वर्गात शिक्षकांनी पुन्हा अभ्यासक्रमाची उजळणी सुरू केली आहे. त्यामुळे पुढील दोन महिन्यात हा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे मोठे आव्हान शिक्षकांसमोर आहे.
-------------
नववी ते बारावीपर्यंत असलेल्या एकूण शाळा- १,२०९
सध्या सुरू असलेल्या शाळा- १,०९८
एकूण विद्यार्थी- २,८४,३५४
विद्यार्थ्यांची उपस्थिती- ९१,२४८
------------
विद्यार्थ्यांची उपस्थिती हळूहळू वाढत आहे. ॲानलाईन व ॲाफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अभ्यासक्रम दिला जातो. दहावी-बारावीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.
- अशोक दोडके, प्राचार्य रेसिडेन्सियल हायस्कूल