लोकमत न्यूज नेटवर्क
शिर्डी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या (एसएससी बोर्ड) वतीने इयत्ता अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेची नावनोंदणी करण्यासाठी मंडळाने निर्माण केलेले संकेतस्थळ विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचीच कसोटी पाहणारे ठरले आहे. ते तातडीने कार्यान्वित न केल्यास तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी दिला आहे.
मंडळाच्या कारभाराप्रमाणेच मंडळाचे संकेतस्थळही बिघडले असून, त्यामुळे विद्यार्थी व पालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा आरोपही त्यांनी केला. सीईटी प्रवेश परीक्षेची नावनोंदणी करण्यासाठी तयार करण्यात आलेले संकेतस्थळ गेल्या आठवड्यापासून बंद आहे. या दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्यच धोक्यात आले आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापन गुणांचा सर्व्हरही ठप्प झाल्याने निकालाला विलंब होण्याची भीती निर्माण झाली आहे. तातडीने संकेतस्थळ सुरू करावे व नोंदणीची मुदत वाढवून द्यावी अन्यथा आंदोलन करणार असल्याचे गोंदकर यांनी सांगितले.