अहमदनगर : नवरात्रौत्सव काळात राज्यात कोठेही भारनियमन होणार नाही, याची अधिकृत घोषणा करूनही तातडीच्या भारनियमनाच्या नावाखाली चार ते सहा तास वीजपुरवठा खंडित होत असल्याने नगरकरांत संताप व्यक्त होत आहे. महापौर संग्राम जगताप, तसेच मनसेच्या वतीने मंगळवारी याच्या निषेधार्थ महावितरणला निवेदन देण्यात आले. नवरात्रौत्सव काळात घरोघरी, तसेच सार्वजनिक मंडळांनी विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. भारनियमनामुळे त्यांच्या उत्साहावर विरजण पडत आहे. शिवाय ‘आॅक्टोबर हिट’चे चटकेही बसायला सुरूवात झाल्याने उकाड्याचा त्रास लोकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे हे अनियमित भारनियमन त्वरित रद्द करावे, अशी मागणी महापौर संग्राम जगताप यांच्यासह नगरसेवक विपुल शेटिया, अविनाश घुले, कमलेश भंडारी, मयूर कुलथे यांनी अधीक्षक अभियंता दत्तात्रय कोळी यांची भेट घेऊन भारनियमनाबाबत नाराजी व्यक्त केली. वीजवाहिन्यांत बिघाड झाल्याचे सांगून शनिवारपासून विविध फिडरवर चार ते सहा तासांचे हे भारनियमन सुरू झाले आहे. याबाबत स्थानिक अधिकाऱ्यांकडे चौकशी केली, तर वरिष्ठांकडून आदेश असल्याचे साचेबद्ध उत्तर मिळते. मनसेच्या वतीनेही कार्यकारी अभियंता बापूसाहेब गोरे यांची भेट घेऊन शहराध्यक्ष गिरीश जाधव, नितीन भुतारे, रोहन शेलार, मयूर घाडगे, सतीश ओव्हळ आदी कार्यकर्त्यांनी लोकांच्या भावना अधिकाऱ्यांना कळवल्या. यात लवकर सुधारणा न झाल्यास मनसे तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला. (प्रतिनिधी)
सलग भारनियमनाने नगरकरांचा संताप
By admin | Updated: September 30, 2014 23:20 IST