अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या धर्तीवर महिला बालकल्याण विभागाने अंगणवाडीचा दर्जा आणि वर्गवारी निश्चित केली आहे. यात जिल्ह्यात असणाऱ्या ४ हजार ८०१ अंगणवाड्यांपैकी तब्बल ३ हजार ३९५ अंगणवाड्यांचा दर्जा खालावलेला आहे. वर्गवारी निश्चित झाल्यामुळे आता महिला बालकल्याण विभागाला अंगणवाड्यांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करता येणार आहेत. जिल्हा परिषदेत प्रत्येक विभागात वेगवेगळे प्रयोग करणारे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी महिला बालकल्याण विभागाच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या अंगणवाड्यांची वर्गवारी निश्चित करण्याचा निर्णय घेतला होता.प्राथमिक शाळांच्या धर्तीवर ही वर्गवारी करण्यात आली. ही वर्गवारी करताना अंगणवाडीत मिळणारे पूर्व प्राथमिक शिक्षण, अंगणवाडीतील विद्यार्थ्यांची उपस्थिती, त्या ठिकाणी देण्यात येणाऱ्या आहाराची स्थिती, कुपोषणाची स्थिती, माता बैठका, अंगणवाडी सेविकांच्या गृहभेटींची स्थिती, त्या ठिकाणी शौचालय, पिण्याच्या पाण्याची स्थिती, अंगणवाडीला स्वत:ची इमारत आहे की नाही? खासगी इमारत आहे का? आदी बाबींचा विचार ही वर्गवारी ठरवताना झालेला आहे. महिला बालकल्याण विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यात ४ हजार ८०१ अंगणवाड्या आहेत. यात १ हजार ४०६ अंगणवाड्यांना अ वर्ग, ब वर्गात १ हजार ८२१ अंगणवाड्या असून, क वर्गात ९९४ अंगणवाड्या तर ड वर्गात ५८० अंगणवाड्या आहेत. अ वर्ग वगळता उर्वरित ब, क आणि ड वर्गात मोडणाऱ्या अंगणवाडीच्या कामकाजासोबत त्या ठिकाणी भौतिक सुविधा निर्माण करण्याची गरज असल्याचे मत महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी मनोज ससे यांनी व्यक्त केले आहे. या वर्गवारीवरून जिल्ह्यातील अंगणवाडीचे चित्र समोर आले आहे. त्यानुसार भविष्यात काम करावे लागणार असल्याचे ससे यांनी स्पष्ट केले.
१४०० अंगणवाड्यांना ‘अ’ श्रेणी
By admin | Updated: March 13, 2016 14:12 IST