हरेगाव : येथील मतमाऊली यात्रौत्सवादरम्यान रहाट पाळण्याच्या लोखंडी जिन्यातून खाली उतरत असताना विजेचा धक्का बसल्याने किर्ती निलेश जाधव (रा.सावेडी, अहमदनगर) या २० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. ‘लोकमत’ने याबाबत सखोल वृत्त प्रकाशित करताच श्रीरामपूर पोलिसांनी जाधव यांच्या मृत्यूस जबाबदार धरुन रहाट पाळणा चालकांसह बेलापूर इंडस्टीजचा मॅनेजर अशा तिघाजणांवर गुन्हा दाखल केला.श्रीरामपूर तालुका पोलिसांनी बेकायदा रहाट पाळणे चालविणे, खासगी जागेत मोठे धोकादायक रहाट पाळणे उभारणे, मनुष्याच्या जीवित हानीस जबाबदारी असणे अशा विविध कलमांखाली या आरोपींवर गुन्हा नोंदविला आहे. हरेगाव दुरक्षेत्राचे पोलीस हेड कॉन्स्टेबल नंदकुमार भैलुमे यांनी ही फिर्याद दाखल केली आहे.९ सप्टेंबर रोजी मतमाऊली यात्रेत रात्री ९़३० ते १० वाजण्याच्या दरम्यान मयत किर्ती जाधव या रहाट पाळण्यातून खाली उतरत असताना त्यांना विजेचा धक्का बसला होता. विजेचा शॉक लागल्यानंतर जाधव यांना उपचारार्थ श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच जाधव यांची प्राणज्योत मालवली. घटनेच्या दुस-या दिवशी श्रीरामपूर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिका-यांनी मयताचे शवविच्छेदन केले. जाधव यांचा मृत्यू इलेक्ट्रिक शॉक लागून झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. दरम्यान मयताचा व्हिसेरा रासायनिक तपासणीसाठी राखून ठेवला असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मयत किर्ती जाधव यांच्या मृत्यूप्रकरणी श्रीरामपूर पोलिसांनी प्रारंभी आकस्मित मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता. या घटनेबाबत ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रकाशित केल्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी महंमद सलीम अब्दुल सत्तार शेख (रा. वार्ड नं २ श्रीरामपूर), सईद (पूर्ण नाव माहित नाही, रा. शाहपूर, जिल्हा पालघर), पापाभाई पठाण (बेलापूर इंडस्ट्रीजचा मेनेजर, रा. हरेगाव) अशा तिघा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
किर्ती जाधवच्या मृत्यू प्रकरणी रहाट पाळणा चालकांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 11:29 IST