अहमदनगर : बारावीनंतर अभियांत्रिकीला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रथम आपल्या आवडीची शाखा निश्चित करून पुढील करिअरची दिशा ठरवावी, असे मत पुणे येथील सुमन रमेश तुलसियानी टेक्निकल कॅम्पस् व्हीआयटी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा़ डॉ़ अभिजित औटी यांनी व्यक्त केले़ ‘लोकमत अॅस्पायर एज्युकेशन फेअर’मध्ये विद्यार्थ्यांसाठी ‘महाविद्यालय आणि शाखा निवड’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते़ ते म्हणाले, अभियांत्रिकीला प्रवेश घेताना महाविद्यालयाची निवड हा महत्त्वाचा विषय असतो़ नामांकित महाविद्यालयांमध्ये शुल्क जास्त असते. मात्र, तेथे सुविधाही चांगल्या मिळतात़ शुल्क कमी असलेल्या महाविद्यालयांत बहुतांशीवेळा सुविधा मिळत नाहीत़ असे सांगत औटी यांनी महाविद्यालयाची निवड करताना कोणत्या बाबी लक्षात घ्याव्यात, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले़ यावेळी प्रा़ केदार जोशी यांनी ‘अभियांत्रिकी म्हणजे नक्की काय?’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले़ ते म्हणाले, कॅम्प राऊंड एकमध्ये जवळपास ८० ते ९० टक्के प्रवेश होतात़ दुसऱ्या व तिसऱ्या राऊंडची वाट पाहत बसल्यास प्रवेश संधी गमविण्याची शक्यता असते़ अभियांत्रिकी प्रवेशासाठी बारावीत खुल्या गटातील विद्यार्थ्यांना पीसीएम ग्रुपला किमान १५० गुण हवेत़ राखीव जागेसाठी १३५ गुण हवेत़ पीसीएमच्या गुणांची बेरीज कमी होत असेल तर केमेस्ट्री ऐवजी बायोलॉजी, बायोटेक, टेक्निकल यापैकी एका विषयातील गुणांसह १५० (खुला गट), १३५ (राखीव गट) झाले तरी तो विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरतो़यावेळी महाविद्यालय, प्रवेश आणि करिअर या विषयी विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेल्या शंकांचे औटी व जोशी यांनी निरसन केले़ (प्रतिनिधी)
आवडीच्या विषयातच करिअरची दिशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2016 00:03 IST