अहमदनगर : काही सभासद बँकेची बदनामी करीत आहेत. त्यांच्याकडून प्रगतीमध्ये अडथळा आणण्याचे काम केले जात आहे. अशा बँकेचे अहित पाहणाऱ्या सभासदांचे सदस्यत्त्व रद्द करण्याची मागणीच सभासदांनी केली. त्याला सभेत एकमुखी मंजुरी देण्यात आली. अनुपस्थित असलेल्या सभासदांच्या प्रश्नांना उत्तरे देवून बँकेचे अध्यक्ष तथा खासदार दिलीप गांधी यांनी वारंवार बँकेच्या विरुद्ध कोर्टात जाणाऱ्या सभासदांचा आपल्या कडक भाषेत समाचार घेतला.नगर अर्बन मल्टिस्टेट बँकेची शतकोत्तरी सहावी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी सायंकाळी झाली. विषय पत्रिकेवरील सर्व विषय मंजूर करण्यात आले. अध्यक्ष खा.दिलीप गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत महापौर सुरेखा कदम, उपमहापौर श्रीपाद छिंदम, ग्रँटमास्टर शार्दूल गागरे, ज्येष्ठ संचालक राधावल्लभ कासट, सुनिल रामदासी,संजय जोशी यांचा सत्कार करण्यात आला. विषय पत्रिकेवरील विषयांना मंजुरी देण्यापूर्वी बँकेचे अध्यक्ष खा. गांधी यांनी दोन सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्यास प्राध्यान्य दिले. प्रश्न विचारणारे सभासद अनुपस्थित असल्याने त्यांना उत्तर देवू नये, अशी मागणीच सभासदांनी केली. मात्र बँकेच्या प्रगतीत खोडा घालणाऱ्या दोन सभासदांच्या प्रश्नांना उत्तर देताना खा. गांधी म्हणाले, आमच्यावर आरोप केले त्यामध्ये तथ्य नाही. सर्वोच्च न्यायालयाने बँकेच्या विरोधातील सर्वच याचिका फेटाळल्या आहेत. तरीही ते वारंवार व्यक्तिद्वेषातून आरोप करीत आहेत. दोघांनीही एकसारखेच प्रश्न विचारले आहेत. गांधी यांचा आक्रमक पवित्रा पाहून उपस्थित सभासदांनी बँकेच्या प्रगतीमध्ये खोडा घालणाऱ्यांचे सभासदत्त्व रद्द करण्याची मागणी केली. त्यावर कार्यवाही करण्याचे गांधी यांनी सांगितले.नफा वाटणीस मान्यता देऊन १५ टक्के लाभांश देणे, दोन बँकांचे अर्बन बँकेत विलिनीकरण व स्वीकृतीचे प्रस्ताव आल्यास त्यासंबंधी पुढील कार्यवाही करण्याबाबतचे अधिकार संचालकांना देण्याचा विषय सभेत मंजूर करण्यात आला. बँकेच्या विलिनीकरणाच्या विषयावर ज्येष्ठ सदस्य डी.एम.कांबळे, उबेद शेख व राहुरी पिपल्स बँकेचे संचालक अग्रवाल यांनी सूचना मांडल्या होत्या.खा. गांधी यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा सादर केला. यावेळी उपाध्यक्ष शैलेश मुनोत, संचालक अनिल कोठारी, अजय बोरा, दीपक गांधी, किशोर बोरा, संजय लुणिया, राजेंद्र अग्रवाल. अॅड. केदार केसकर, साधना भंडारी, मनेश साठे, अशोक कटारिया, राधावल्लभ कासट, विजय मंडलेचा, नवनीत सुरपुरिया, मीना राठी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
बँकेच्या प्रगतीत खोडा घालणाऱ्यांचे सभासदत्त्व रद्द करणार
By admin | Updated: September 27, 2016 23:53 IST