अहमदनगर/पाथर्डी : राहुरीच्या क्षितिज प्रकाशन या खासगी संस्थेने रविवारी नगरमध्ये आयोजित सावित्रीबाई फुले प्रज्ञाशोध परीक्षा संयोजकांनी ऐनवेळी रद्द केली. यामुळे जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. परीक्षेसाठी येण्या-जाण्याचा आर्थिक भुर्दंड या विद्यार्थी आणि पालकांना बसला, याशिवाय वेळही वाया गेला आहे. तर पाथर्डीत सुमारे दीड तास उशीरा सुरू झालेल्या पेपरमध्ये प्रश्नपत्रिका कमी पडल्याने गोंधळ उडाला. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे परीक्षेसंदर्भात विचारणा केली असता त्यांनी कानावर हात ठेवले. क्षितिज प्रकाशन या खासगी संस्थेच्या वतीने इ. २ री ते ७ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले प्रज्ञाशोध परीक्षेचे संयोजन केले होते. या परीक्षेला जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी, खासगी शाळेतील विद्यार्थी बसले होते. यासाठी वर्गनिहाय विद्यार्थ्यांकडून फी आकारण्यात आलेली होती. यात २ री साठी १०० रुपये, ३ री साठी १३० रुपये, ४ थी साठी १५०, ५ वी साठी २०० रुपये, ६ वी साठी २५० आणि ७ वी साठी ३१० रुपयांप्रमाणे फी आकारण्यात आली. या परीक्षेला बसण्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांनी शिक्षण विभागाची कोणतीच परवानगी घेतलेली नव्हती. अनेक ठिकाणी शिक्षकांनी पालकांना सक्ती करून विद्यार्थ्यांना परीक्षेस बसवले होते. रविवारी परीक्षेचा नियोजित वेळ सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत होता. मात्र, १२ वाजेपर्यंत संयोजक आले नाहीत. शहरातील सविता रमेश फिरोदिया आणि समर्थ विद्या मंदिर शाळेत परीक्षा केंद्र होते. या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने परीक्षा रद्द झाल्याची माहिती पालक आणि शिक्षकांना दिली. कर्जत, श्रीगोंदा, नगर तालुक्यातील शेकडो विद्यार्थी खासगी वाहनांनी नगरला आले होते. परीक्षा रद्द झाल्याने या विद्यार्थ्यांना रस्त्यावर, शहरातील इमारतीच्या आडोशाला बसून जेवण करण्याची वेळ आली. या परीक्षेत भाषा, गणित आणि बुध्दिमत्ता विषयाचा पेपर होणार होता. तांत्रिक कारणामुळे परीक्षा रद्द परीक्षा रद्द झाल्यानंतर दुपारी क्षितिज प्रकाशनचे जी. के.गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी परीक्षेला उशीर झाल्याने नगरमधील परीक्षा रद्द करावी लागली. पुढील आठवड्यात परीक्षेचे पुन्हा नियोजन करण्यात येणार आहे. उत्तरपत्रिकामध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. ही अडचण सोडवण्यास वेळ झाला, यामुळे परीक्षा रद्द करावी लागली. सकाळपासून ग्रामीण भागातून लहान मुले आलेली आहेत. उन्हाचा तडाखा मोठा आहे. त्याच परीक्षेत एकच गोंधळ झाला. यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. शिक्षण खात्याची परवानगी नसेल तर अशा परीक्षा का घेतल्या जातात, असा सवाल पाथर्डी येथील पालक अजय साठे, काकासाहेब उदागे, विठ्ठल बोकेफोडे, संदीप श्ािंदे यांनी उपस्थित केला आहे. या खासगी परीक्षेच्या नावाखाली जिल्ह्यात लाखो रुपयांची विद्यार्थी आणि पालकांची लूट सुरू आहे. या लुटीला प्रशासनातील अनेकांचे वरदहस्त असल्याची चर्चा सुरू आहे. दरवर्षी हा प्रकार सुरू असताना जिल्हा परिषद या प्रकाराला आळा का घालत नाही, असा सवाल पालकांमधून उपस्थित करण्यात येत आहे. ज्या शाळांमध्ये परीक्षा केंद्र होते, तेथे जाऊन विचारणा केली असता, आमचा परीक्षेशी संबंध नाही. परीक्षेसाठी आम्ही विनामूल्य जागा उपलब्ध करून दिली होती. परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपर्यंत संयोजक आले नाहीत. यामुळे आम्हाला परीक्षा रद्द झाली असल्याचे शिक्षक आणि पालकांना सांगावे लागले. ही प्रज्ञाशोध परीक्षा खासगी संस्थेमार्फत घेण्यात येत आहे. याला जिल्हा परिषदेची कोणतीच परवानगी नाही. पालक स्वइच्छेने विद्यार्थ्यांना परीक्षेला बसवतात. आपली फसवणूक झाली, असे ज्या पालकांना आणि शाळेच्या मुख्याध्यापकांना वाटत असल्यास त्यांनी गुन्हे दाखल करावे, अथवा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे तक्रार करावी. -अशोक कडूस, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि. प.
ऐनवेळी परीक्षा रद्द, पालक संतप्त
By admin | Updated: March 20, 2016 23:17 IST