अहमदनगर : गोरगरिबांना रोजगार देणाऱ्या महामंडळात गेल्या पंधरा वर्षांत मोठा भ्रष्टाचार झाला. रोजगाराची खरी गरज असलेल्या तरुणांची दलालांकडून फसवणूक झाली. आता असे दलाल दिसले की, त्यांना बेड्या ठोकण्यात येतील. कर्ज मिळविण्यासाठी थेट आॅनलाईन अर्ज सुरू केल्याने दलालांचे उच्चाटन होईल, अशी अपेक्षा राज्याचे समाजकल्याण मंत्री दिलीप कांबळे यांनी व्यक्त केली.युवाशक्ती प्रतिष्ठानच्यावतीने पेमराज सारडा महाविद्यालयात रविवारी नोकरी मेळावा आणि मुद्रा कर्ज मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री कांबळे बोलत होते. या कार्यक्रमास खासदार दिलीप गांधी, मेळाव्याचे आयोजक व नगरसेवक सुवेंद्र गांधी, मलकापूरचे आमदार चैनसुख संचेती, हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, मानद सचिव सुनील रामदासी, श्रीकांत साठे, भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा गितांजली काळे, युवा मोर्चाचे अध्यक्ष नितीन शेलार, नगरसेविका मालन ढोणे, प्राचार्या अमरजा रेखी, प्रा. मकरंद खेर, प्राचार्य सुनील पंडित आदी उपस्थित होते.मंत्री कांबळे म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकारने कौशल्य विकास कार्यक्रम हाती घेतला आहे. मागासवर्गीयांसाठी एमआयडीसीमध्ये २० टक्के जागा राखीव ठेवल्या आहेत. कर्ज फेडल्याने पत निर्माण होते आणि त्याला पाहिजे तेवढे कर्ज घेता येते. मात्र, कर्ज घेतले म्हणजे ते फेडायचे नसते, अशी लोकांची धारणा तयार करण्यात आली. अशा वृत्तीमुळेच अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात पाचशे कोटींचा घोटाळा उघडकीस आला. गोरगरिबांचे पैसे खाणारा रमेश कदम जेलमध्ये गेला. असे घोटाळे पुन्हा होणार नाहीत, यासाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहेत. व्यवसायासाठी कर्ज मिळविण्यासाठी एक रुपयाचाही वशिला लागत नाही. महामंडळातील ८६ अधिकारी आतापर्यंत निलंबित केले आहेत. आता नवीन भरती करायची आहे. भरतीसाठीही जागेवरच परीक्षा आणि जागेवरच निकाल देण्यात येणार असल्याने घोटाळा होणार नाही. युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून तरुणांना व्यवसाय उभारणीसाठी दहा कोटी रुपये देण्याची तयारी आहे. यशाला शॉर्टकट नसल्याने तरुणांनी परिश्रम करावेत. कष्टाची शिदोरी आयुष्यभर पुरते, अन्यथा कोट्यवधी एकर जमिनीचे मालक असूनही शेवटी जेलमध्ये बसण्याची वेळ येते. गायी-म्हशींच्या नावावरही शिष्यवृत्ती लाटून ३८ कोटी खाल्ल्याची घटनाही घडली. अशा घोटाळेबहाद्दरांची साफसफाई करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. (प्रतिनिधी)जेलमध्ये बसून छगन भुजबळ यांना कंटाळा आला आहे. वेळ जायचा असेल तर माझ्या तोडीचे मित्र जेलमध्ये पाठवा, असे भुजबळांना वाटते आहे. त्यांची सोय लवकरच केली जाईल. परमेश्वराला वरती हिशेब करायला वेळ नसल्याने सर्व हिशेब इथेच चुकते करावे लागणार आहेत. माणसाने हक्काचे, कष्टाचे पैसे कमवावेत. शेजारच्या ताटात बघू नये. भाजप हा पक्ष कष्टाने उभा राहिला आहे. जे मिळवाल ते कष्टाने मिळवा. गरिबांचे पैसे खाणारे जेलमध्ये पाठविले, असे कांबळे म्हणाले. दिलीप गांधी यांना लवकरच केंद्रात मोठी जबाबदारी मिळणार असल्याचे भाकितही कांबळे यांनी केले.३८ कंपन्या आणि ११०० तरुणांचे अर्जनगर, पुणे, नाशिक, औरंगाबाद आदी शहरातील तब्बल ३८ कंपन्यांचे स्टॉल नोकरी मेळाव्याच्या ठिकाणी लावण्यात आले होते. या स्टॉलवर कंपनीच्या प्रतिनिधींनी उमेदवारांचे अर्ज भरून घेत मुलाखती घेतल्या. यासाठी नगर आणि बाहेरील जिल्ह्यातून १ हजार १०० मुलांनी हजेरी लावली. त्यापैकी सहाशे मुलांची एक निवड यादी तयार करण्यात आली असून त्या उमेदवारांना संबंधित कंपन्यांमध्ये पुन्हा मुलाखतीसाठी बोलविण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजक सुवेंद्र गांधी यांनी दिली. यंदाचा नोकरी मेळावा सहावा होता. पाच वर्षात दोन हजार तरुणांना मेळाव्याच्या माध्यमातून नोकरी दिल्याचे गांधी यांनी सांगितले.
दलालांना बेड्या ठोकणार
By admin | Updated: May 8, 2016 23:56 IST