जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी शुक्रवारी तालुकास्तरीय यंत्रणांशी ॲानलाईन संवाद साधून कोरोना उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी डॉ. अजित थोरबोले, ऊर्मिला पाटील, रोहिणी नऱ्हे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. वीरेंद्र बडदे, डॉ. बांगर, डॉ. भागवत दहिफळे, आदींनी बैठकीत भाग घेतला.
सध्या जरी रुग्णसंख्येत काहीशी घट दिसून येत असली तरी संसर्गाचा धोका अजून संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात आता १८ वर्षांपुढील सर्वांनाच लस देण्यात येत आहे. त्या-त्या ग्रामीण रुग्णालय अथवा लसीकरण केंद्रावर जाऊन नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. तेथील आरोग्य यंत्रणेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, जेणेकरून अशा केंद्रावर गर्दी होणार नाही, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.