संगमनेर : अज्ञात चोरट्यांनी लोखंडी टॉमीने दोघा तरूणांना मारहाण करून घरातील एकूण २ लाख ३५ हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना शहरातील गोल्डन सिटीमध्ये घडली. याप्रकरणी शहर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांची माहिती अशी, शहरातील गोल्डन सिटीमध्ये बांधकाम व्यावसायिक शेटीबा बाळा पवार (वय ६५) यांचा बंगला आहे. शनिवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चौघा चोरट्यांनी घरातील देवघराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. लोखंडी कपाटाचे लॉक तोडून २ लाख रूपयांची रोकड व ३५ हजाराच्या चांदीच्या तोळबंद्या चोरून पलायन केले. दरम्यान झोपेतून जागे झालेल्या सुनील शेटीबा पवार व अनिल शेटीबा पवार या भावंडांनी चोरट्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांनी हातातील लोखंडी ‘टॉमी’च्या सहाय्याने दोघा भावंडांना जबर मारहाण केली. या मारहाणीत दोघे जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.याप्रकरणी शेटीबा पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक प्रताप पवार यांनी भेट देऊन पाहणी केली. या घटनेने गोल्डन सिटी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक श्याम सोमवंशी करीत आहेत. (प्रतिनिधी)
‘गोल्डन सिटी’मध्ये धाडसी घरफोडी
By admin | Updated: September 27, 2014 23:08 IST