अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील फरार आरोपी बाळ बोठे याने औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या अर्जावर १ फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे. गुरुवारी (दि. २८) यावर खंडपीठात सुनावणी झाली.
जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर बोठे याने ॲड. संतोष जाधवर यांच्या माध्यमातून ३१ डिसेंबर रोजी खंडपीठात अर्ज केला होता. या अर्जावर प्रथम सुनावणी १८ जानेवारीला झाली. त्यावेळी न्यायालयाने बोठे याचा तात्पुरता अटकपूर्व जामीन फेटाळत २८ जानेवारीला सरकारी पक्षाचे म्हणणे मागितले होते. त्यानुसार गुरूवारी (दि. २८) न्यायमूर्ती मंगेश पाटील यांच्यासमोर सुनावणी झाली. यात बोठे याच्या वकिलांनी वेळ वाढवून मागितली असून त्यावर आता पुढील सुनावणी १ फेब्रुवारीला होणार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे सरकारी पक्षाला म्हणणे सादर करण्याची संधी मिळाली नाही. सरकारी पक्षाचे म्हणणे आता १ फेब्रुवारीला विचारात घेतले जाणार आहे.