श्रीरामपूर : येथील बांधकाम व्यावसायिक व वीरशैव लिंगायत समाजाचे कार्यकर्ते गिरीष गाडे यांच्या मातोश्री श्रीमती सुमनताई पोपटआप्पा गाडे (वय ७४) यांचे बुधवारी (दि. ३) दुपारी निधन झाले. मात्र, त्यांच्या इच्छेनुसार पारंपरिक प्रथेला फाटा देवून त्यांनी देहदान केले.
वीरशैव लिंगायत समाजात धार्मिक प्रथा परंपरेनुसार जमिनीत खड्डा खोदूनच पार्थिव जमिनीत दफन केले जाते. त्यावर समाधी बांधली जाते. परंतु, या प्रथेला छेद देत आठ- नऊ वर्षांपूर्वीच श्रीमती सुमनताई गाडे यांनी मरणोत्तर देहदान करण्याचा संकल्प केला होता. आपला देह जमिनीत पुरून अथवा अग्निसंस्कार करून त्याचा समाजाला काय उपयोग होणार ? या भावनेतून त्यांनी हा निर्णय घेतला. जन्म एकदाच मिळतो. तेव्हा माझ्या देहाचा समाजाला फायदा व्हावा, या उदात्त हेतूने प्रेरित होऊन माझ्या निधनानंतर देहदान करण्यात यावे, अशी इच्छा त्यांनी मुलाजवळ व नातेवाईक यांच्याकडे व्यक्त केली होती. त्याप्रमाणे देहदान करण्याचा अर्जदेखील लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या वैद्यकीय महाविद्यालयात सादर केला होता. त्यांच्या या क्रांतिकारक निर्णयाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. देहदान तसेच अवयवदान ही काळाची गरज आहे. हा संदेश गाडे यांनी कृतीतून समाजाला दिला. देहदान करण्यापूर्वी पार्थिवावर लिंगायत धर्म परंपरेने अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. श्रीरामपूर येथील लिंगायत समाजातील ही पहिलीच घटना आहे. स्व. सुमनताई यांच्या पश्चात एक मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.
---
फोटो- ०३ सुमनताई गाडे